ममता बॅनर्जींना भाजपचा धसका

सामना ऑनलाईन । मुंबई

निवडणुकीच्या प्रारंभीपासूनच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या वाढत्या जनाधाराचा धसका घेतला असून, भाजप नेत्यांना जाणूनबुजून पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी मनाई करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सारी मूल्ये पायदळी तुडवली जात असून, जेव्हा सगळ्या सीमा संपतात, तेव्हा पतन अटळ असते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान वाहनांवर लाठय़ा फेकण्यात आल्या तसेच भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला. याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल राज्य म्हणजे केवळ ममतांची मालकी असे समजून राज्यकारभार हाकला जात आहे. राज्य सरकारची संपूर्ण शक्ती पणाला लावून ही निवडणूक लढविताना त्यांनी लोकशाहीची लक्तरे वेशीकर टांगली आहेत. या निवडणुकीत ममतांना जनता नमविल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.