
सामना प्रतिनिधी। देवगड
जामसंडे बाजारपेठेत अत्तर विक्री करणाऱ्या एका संशयित युवकास नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अखिम अजिम तर्के (रा-कुमारीया, तांडा, जि.रायपूर, उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. अत्तर विकणाऱ्या या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जामसंडे येथील व्यापाऱ्यांनी त्याला देवगड पोलिसांच्या ताब्यात दिले.
स्थानिक व्यापारी राजू पाटील, नगरसेवक निरज घाडी अन्य व्यापारी बंधूंनी त्याची वैयक्तिक चौकशी व अन्य माहिती घेत असताना त्यात विसंगती आढळून आल्याने सदर युवकाबाबत संशय बळावला व त्यामुळे याची माहिती देवगड पोलिसांना देवून देवगड पोलिसांना त्याला अधिक चौकशीकरिता ताब्यात घेतले सदर घटना बुधवारी सकाळी 11 वा.च्या सुमारास घडली.
संबंधित युवक हा उत्तरप्रदेश येथील असून पोलीस स्थानकात नेल्यानंतर त्याची सविस्तर माहिती घेत असताना त्याच्या बोलण्यात विसंगती आढळून आली त्यानुषंगाने त्याच्याजवळिल विक्री करत असलेल्या स्प्रे व अन्य वस्तुंची तपासणी केली असता त्याच्याजवळ निजामुद्दीन एक्सप्रेसचे रेल्वेतिकिट व अन्य काही कागदपत्रे सापडली.देवगड पोलिस स्थानकाचे पोलीस निरिक्षक दिपक गुजर, वाहतुक पोलिस गुरूप्रसाद परब, दत्ता गायकवाड यांनी संबंधितांची कसून चौकशी केली असून अधिक तपासाकरिता दहशतवादी विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे अन्य साथीदार अशाच प्रकारचा व्यवसाय कणकवली येथिल लॉजमध्ये राहून करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

































































