चेन खेचली आणि रेल्वे उलटी धावली, मोटरमनमुळे वाचले प्रवाशाचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
passenger-train

रेल्वे आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्याऐवजी उलट्या दिशेने म्हणजे निघाली त्याच दिशेने धावू लागली तर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडेल. जळगावमध्ये एक अशीच घटना गुरुवारी घडली. एक रेल्वे सुमारे दीड किलोमीटर उलट्या दिशेला धावली, त्यामुळे प्रवासी बुचकळ्यात पडले. मात्र त्यामागचं कारण कळताच प्रवाशांनी मोटरमनवर कौतुकाचा वर्षाव केला.

देवळाली-भुसावळ पॅसेंजर ट्रेनमधून एक प्रवासी पाचोरा-महेजी रेल्वे स्थानकांदरम्यान पडला. हे लक्षात येताच सहप्रवाशाने साखळी खेचली आणि मोटरमनपर्यंत ही बाब पोहोचली. त्यानंतर मोटरमन आणि गार्ड यांनी चर्चा करून गाडी मागे नेण्याचा निर्णय घेतला. गाडी मागे घेतल्याने अन्यप्रवासी बुचकळ्यात पडले. पण साखळी ओढल्यानंतर रेल्वे उलटी धावल्याने प्रवाशांनी थोडा धीर धरला. व्यक्ती पडलेल्या ठिकाणापर्यंत गाडी नेण्यात आली. गाडीतून पडल्याने तरुण जखमी झाला होता, त्याला तातडीने मदतीची गरज होती. मग सहप्रवाशांनी त्याला पुन्हा गाडीत घेतले आणि जवळच्या रेल्वे स्थानकावर अॅम्ब्युलन्स बोलवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. आता या प्रवासी तरुणाची प्रकृती बरी असल्याचे कळते.

या प्रकारामुळे गाडी गंतव्यस्थानी तासभर उशिराने पोहोचली. मात्र प्रवाशांनी जखमी तरुणाचे प्राण वाचवणाऱ्या मोटरमनचे कौतुक केले. मोटरमनच्या प्रसंगावधानतेसाठी त्याचा गौरव करण्यात येणार असल्याचे रेल्वे जनसंपर्क विभागकडून सांगण्यात आले आहे.