आळंदीत भाविकांची गर्दी; माऊलींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी येथील माऊली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करत श्रींची पूजा सायंकाळी भागवत एकादशीनिमित्त श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्रींच्या दर्शनासाठी भाविक, नागरिकांनी गर्दी केली होती.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीत स्नान करीत अनेक भाविकांनी तीर्थक्षेत्री स्नान माहात्म्य जोपासले. श्रींचे दर्शन तसेच मंदिर प्रदक्षिणा, ग्रामप्रदक्षिणा करत अलंकापुरीत एकादशी उत्साहात साजरी केली. राज्यातून आलेल्या भाविकांनी परंपरांचे पालन करत आळंदीत हरिनाम गजर करीत अनवाणी पायाने नगरप्रदक्षिणा केली. आळंदी मंदिरातील परंपरांचे पालन करीत आळंदी देवस्थानने एकादशीनिमित्त धार्मिक उपक्रम आणि फराळाचा प्रसाद वाटप केला. महिला, पुरुष वारकरी भाविकांनी दर्शनबारीतील रांगेतून दर्शन घेतले.

भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन होण्यासाठी प्रमुख विश्वस्त सरपंच योगेश देसाई यांचे मार्गदर्शनाखाली व नियंत्रणात मंदिर व्यवस्थापक माउली वीर, वैष्णव रणदिवे चोपदार, मालक ऋषिकेश आरफळकर, मंगेश आरू, साहिल कुऱ्हाडे, श्रींचे पुजारी क्षेत्रोपाध्ये अमोल गांधी, ज्ञानेश्वर पोंधे, सेवक कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस बंदोबस्तावरील कर्मचारी यांनी धार्मिक उपक्रमास तसेच भाविकांचे सुलभ दर्शन व्यवस्थेस परिश्रम घेतले. आजोळघर दर्शनबारी परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती, शांतता सुव्यवस्था तसेच पोलिस बंदोबस्तासाठी आळंदी पोलीस यंत्रणेने काम पाहिले.