व्यंकटेश्वराला भक्ताचे भरभरून दान; दिले इतके कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद मधील एका भक्ताने सोमवारी तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ‘श्री व्यंकटेश्वर प्राणदान ट्रस्ट’ला १ कोटींहून अधिक रुपयांची देणगी दिली. या देणगीचा ‘डिमांड ड्राफ्ट’ श्रीवारी मंदिरातील रंगनायकुला मंडपामध्ये देवस्थानचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सी. व्यंकय्या चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. अल्लुरी वर्मा यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या ट्रस्टला १ कोटींहून अधिक रुपयांची देणगी दिली आहे. अशी माहिती मंदिराच्या प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. वर्मा हे हैदराबाद येथील एका पोलाद निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याची माहिती निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

नोव्हेंबर २००१ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘श्री व्यंकटेश्वर प्राणदान ट्रस्ट’चा मुख्य उद्देश, हृदय, मूत्रपिंड (किडनी), मेंदू, कर्करोग आणि इतर जीवघेण्या आजारांनी ग्रस्त असलेल्या गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवणे हा आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.