
जिल्ह्यातील नागणवाडी, आंबेओहळ सर्फनाला आणि धामणी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य तो न्याय देण्याचे कार्य जलसंपदा विभागामार्फत करण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
राधानगरी, कागल तसेच आजरा विभागातील लघू-मध्यम प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संपत देसाई, संजय तरडेकर, अशोक जाधव, धनाजी गुरव उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, शासकीय यंत्रणेकडून प्रकल्पग्रस्तांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक दोन महिन्यांत करावी, तसेच प्रकल्पग्रस्तांनीही यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री जयंत पाटील यांनी केले.
प्रकल्पग्रस्तांच्या आर्थिक मोबदल्याचा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर निकाली काढावा. यामध्ये जिल्हाधिकाऱ्य़ांनी स्वतः लक्ष द्यावे, अशी सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केली, तर प्रशासनाने जमिनीसह अस्तित्वातील सर्वांची मोजणी नियमाप्रमाणे करावी. योग्य मोबदला मिळाला तर मोजणीला विरोध नसल्याचे प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट केले. प्रकल्पबाधितांसंदर्भातील आवश्यक ती मोजणी पावसाळ्यापूर्वी संपविण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी दिली.
अतिक्रमणांवर मर्यादा आणल्यास पुराचे संकट कमी होईल
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील पूरस्थितीसंदर्भात वडनेरे समितीने अहवाल सादर केला आहे. अनेक नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. अशा बऱ्य़ाच बाधा असल्याने पाणी तुंबून राहते. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर मर्यादा आल्या, तर पुराचे संकट कमी होईल, असे मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी नागरिकांनी जागृत होऊन, अतिक्रमण करणाऱ्य़ांविरोधात तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कर्नाटकच्या मंत्र्यांसोबत आठ दिवसांत चर्चा करणार
संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, तिन्ही जिल्ह्यांतील यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्य़ांना शेजारच्या कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण प्रशासनाच्या संपर्कात राहण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी कर्नाटक सरकारशी योग्य समन्वय झाल्याने अलमट्टीतून मोठय़ा प्रमाणात विसर्ग करण्यात आला. आता येत्या 8-10 दिवसांतही कर्नाटकचे मंत्री तसेच अलमट्टी प्रशासनाशी विसर्ग वाढविण्यासाठी चर्चा करणार असल्याचेही मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.




























































