
सामना प्रतिनिधी । राहुरी
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी आज मंगळवारी तालुक्यातील धनगर समाज बांधवाने मेंढ्या, शेळ्या समवेत राहुरी तहसिल कार्यालयावर मोर्चा नेऊन तब्बल ३ तास ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी खंजीरी, संबळच्या गजरात जागरण गोंधळ घालुन भाजपा सरकारला साकडे घालण्यात आले.
नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या बिरोबा मंदिरापासून या मोर्चाला सुरूवात झाली. अगावर घोंगडी, डोक्यात पिवळा फेटा, धोतर या धनगर वेशभूषात गजे ढोलचा गजर करत शहरातुन राहुरी तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसिलच्या आवारात मेंढ्या व शेळ्या बांधुन यळकोट यळकोट जय मल्हारच्या निनादात जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले,नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी असून तो सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ.कर्डीले यांनी म्हटले.
धनगर समाजाचे आण्णासाहेब बाचकर, संजय तमनर, नानासाहेब जुंधारे, ज्ञानेश्वर बाचकर, विजय तमनर, दत्ता खेडकर, भारत मतकर यांची भाषणे झाली. तहसीलदार अनिल दौंडे व पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.































































