मस्साजोगचा अन्नत्याग; मागण्या मान्य न झाल्यास पाणीही सोडणार, संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 75 दिवस उलटले, पण अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाही. आरोपींना मदत करणारे उजळमाथ्याने फिरत आहेत. पोलिसांवर पुरावे नष्ट करण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार, असा सवाल करत संपूर्ण मस्साजोग गावाने अन्नत्याग आंदोलन सुरू केले. गावातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही. मागण्या मान्य न झाल्यास पाणीही वर्ज्य करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबासह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सकाळी दहा वाजता अन्नत्याग केला. चार दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले होते. मात्र सरकारने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी सकाळीच एल्गार पुकारला. मस्साजोगसह पंचक्रोशीतील इतर गावांमधील ग्रामस्थही उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले.

सरकारची बहाणेबाजी बस्स झाली

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, अशा गर्जना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. देशमुख कुटुंबाला दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी त्यांची आहे. सरकार बहाणे शोधत असून न्याय होईल का, असा संशय आहे. मोकाट आरोपींना जेरबंद करा, आरोपींना मदत करणारांना सहआरोपी करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

  • संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून संपूर्ण गाव अन्नत्याग करून आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे गावात एकाही घरात आज चूल पेटली नाही.