
सामना प्रतिनिधी । परभणी
‘भाजप सरकारने महाराष्ट्रातील धनगर समाजाची घोर फसवणूक केली असून सत्तेत येऊन चार वर्ष उलटली तरी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. आत्तापर्यंत किमान कॅबिनेटच्या २०० बैठका पार पडल्या. परंतू यामध्ये धनगर आरक्षण संदर्भात कुठलाही निर्णय सरकाने घेतला नाही. त्यामुळे आता तरी धनगर समाजाला आरक्षण द्या, अथवा सत्तेतून जा’, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परभणीत केला.
खंडोबा बाजार परिसरात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त राजे मल्हारराव होळकर मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी उशिरा करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, धनगर समाजाचे नेते मारोती बनसोडे, माजी खासदार सुरेश जाधव, शिवाजी दळणर, सुरेश भुमरे, विठ्ठल रबदडे, आनंद बनसोडे यांची उपस्थिती होती.
नागपूरच्या संघ कार्यालयातून सरकार चालते!
‘सध्या महाराष्ट्रात चालणारे भाजप सरकार हे नागपूर येथील संघ कार्यालयातून चालते. सरकारची महत्वाचे निर्णय नागपूर येथील संघ कार्यालयात बसून घेतले जातात. यामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही’, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
































































