आरक्षणासाठी धनगर समाजाचा हिंगोली जिल्ह्यात मोर्चा आणि रास्तारोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात रास्तारोको करण्यात आला. जिल्ह्यातील आखाडा बाळापुर, कनेरगाव नाका, औंढा नागनाथ, सेनगाव या चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर वसमत तालुक्यात धनगर समाज बांधवांनी मोर्चा काढला. कुरुंदा व गिरगाव येथे बंद पाळण्यात आला.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात झाली. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे नवीन बसस्थानकाजवळ नांदेड ते हिंगोली रस्त्यावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करून पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते. 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीला दहा महिन्यांचा अवधी शिल्लक असून सरकारने या आश्वासनाची पूर्तता करावी. मागील चार वर्षात सरकारने हे आश्वासन पूर्ण केले नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच धनगड व धनगर या एकच जाती असल्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी अशीही मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे परिसरातील वेगवेगळ्या गावातील धनगर समाज बांधवांनी हिंगोली ते अकोला राज्य रस्त्यावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. हिंगोली ते परभणी रस्त्यावर औंढा नागनाथजवळील पिंपळदरी फाटा येथे आणि सेनगाव शहरात जिंतुर टी पॉइंट येथे देखील रास्तारोको करण्यात आले. तसेच वसमत येथे तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले. मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनालाही मोर्चेकऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी वसमत तालुक्यातील कुरुंदा व गिरगाव येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. रास्ता रोको मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.