धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाकूर तालुक्यातील आष्टा येथील एका तरूणांने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण सरकार देत नसून याची तत्काळ अंमलबजावणी सरकारने करावे या मागणीसाठी नैराश्यातून तरूणांने सोमवारी पहाटे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील आष्टा येथील रमेश चंद्रकांत फुले (32) यांनी आपल्या खिशात ठेवलेल्या चिठ्ठीत असे नमूद केले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून मी अनेक आंदोलनात भाग घेऊन आंदोलने केली, मात्र कोणतेही सरकार समाजाला न्याय देत नसून यामुळे मी निराश झालो आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी तातडीने सरकारने अंमलबजावणी करावी यासाठी मी आत्महत्या करत असून माझे मुलेबाळ सरकारच्या स्वाधीन करत असल्याचा उल्लेख केला आहे.

रमेश यांनी सोमवारी पहाटेच्या दरम्यान आष्टा मोड जवळील रेल्वे पटरीवर सोमवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास नांदेड -पनवेल रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे .दरम्यान नळेगाव बीटचे जमादार भागवत मामडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील पोलीस तपास चालू आसल्याचे सांगितले आहे. नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. याबाबत धनगर समाज विकास परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन मृत तरूणाच्या परिवाराला सरकारने दहा लाख रूपये द्यावे, कुंटुबातील एका व्यक्तींना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा आणि धनगर समाजाला त्वरीत एसटीचे आरक्षण द्यावे आदी मागणी केली आहे. मयत रमेश यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, भाऊ व आई वडील आहेत.