
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा झंजावात महाराष्ट्र अनुभवत आहे. गुरुवारी जनसंवाद यात्रा धाराशिव येथे पार पडली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफानी भाषण केलं. महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला खेळखंडोबा, संकटात असलेले लोकशाही, शेतकरी – तरुण आणि महिलांचे प्रश्न यावरून त्यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं. महाराष्ट्र चवताळलाय, फक्त निवडणुकांची वाट पाहतोय! असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं.
आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले की भाजपला आता समजलं आहे की इतर पक्षांप्रमाणे आमदार, खासदार फोडले म्हणून शिवसेना संपणार नाही. शिवसेना अशी संपणार नाही. शिवसेना भाजपला संपवून, गाडून, मूठमाती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. त्यावरून उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात लक्ष्य केलं. देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येतात पण मणिपूर पेटलं आहे तिथे जायची हिंमत नाही. तिथे शेपूट घालताय आणि महाराष्ट्रात फणा काढतोय हा नागोबा. कश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, अरुणाचलमध्ये चीन घुसतोय तिकडे शेपूट आणि असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री इकडे येऊन आमच्यावर फणा काढून गेला, अशी सणसणीत टिका उद्धव ठाकरे यांनी केली.
महाविकास आघाडीची रिक्षा पंक्चर झाले म्हणणाऱ्या अमित शहांच्या सरकारचं काय? ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागलेली आहेत. भ्रष्टाचारी तितुका मेळवावा भाजप धर्म वाढवावा, असं भाजपचं चाललं असल्याचं म्हणत भाजपच्या नीतिची त्यांनी अक्षरश: सालटी काढली.
कोरोनाच्या काळात मी म्हटलं होतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी. मोदीजींनी त्यातली अर्धीच घोषणा उचलली ‘मेरा परिवार’. पण त्या परिवाराची जबाबदारी कोण घेणार? असा रोखठोक सवाल त्यांनी यावेळी केला.
‘नमो महारोजगार’ मेळावा म्हणजे इतर पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये घ्यायचं आणि त्यांना कामाला लावायचं, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
भाजपला आता कळून चुकलं आहे की, महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालू शकत नाही. मोदी खोटा सिक्का आहेत, म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं. मोदींचे फोटो वापरून आता निवडून येता येणार नाही, म्हणून शिवसेना फोडली. भाजप आणि मिंधेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या वडलांचे फोटो वापरून मत मागावयची होती, असं ते म्हणाले.
ज्या ज्या वेळी पाठीवर वार होतो, त्यावेळी दुश्मनाचा कोथळा काढण्याची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे, असंही ते म्हणाले.
घटनाबाह्य सरकारसारखी 84 कोटी रुपयांची जाहिरात करण्यापेक्षा, त्या पैशात मी माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव दिला असता, असं सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला.
निवडणूक रोख्यांमधून भाजपने हजारो कोटी जमवले. मग देशाला लुटलं कुणी?, असा सवाल त्यांनी केला.
गद्दारांच्या टिकेवर जोरदार प्रत्युत्तर
गद्दारांपैकी एकानं माझ्यावर टिका केली की मी मुख्यमंत्री नसताना मुख्यमंत्री असल्यासासारखा फिरतोय. पण माझ्या लक्षात आलं आहे की मुख्यमंत्री नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्या असतात. माझे मंडप, मैदानं गच्च भरलेले असतात, अशा शब्दात त्यांनी गद्दारांच्या टिकेच्या ठिकऱ्या उडवल्या.





























































