धारावीत आठवडाभरात 50 टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली, लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली असून धारावीतही 99 पर्यंत गेलेली रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. मोठय़ा प्रमाणात सुरू असलेले लसीकरण, कोरोना चाचण्या आणि रुग्णांचे योग्य व्यवस्थापन यामुळे धारावीत आज दिवसभरात 37 रुग्ण सापडले असून साक्रिय रुग्णांची एक हजारपर्यंत गेलेली संख्या कमी होऊन 961 वर पोहोचली आहे. दरम्यान, लक्षणे नसलेल्या रुग्णांचीच संख्या जास्त असल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादत केवळ आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. इतरांना बेस्ट तसेच इतर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय ठेवला आहे. त्याचबरोबर उपाययोजना आणि दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत 8 एप्रिलला रुग्णसंख्या 99 वर पोहोचली होती. आतापर्यंत 25 मायक्रो पंटेनमेंट झोन आणि 556 इमारती सील करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर धारावीत कोरोना चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून कोरोना सेंटर्सची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाढते लसीकरण आणि कोरोना चाचण्यांमुळे रुग्णांची संख्या 50 पेक्षा खाली आली आहे.

धारावीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या वाढली, मात्र कोरोनाचे हे सर्व रुग्ण लक्षणे नसलेले रुग्ण होते. धारावीत घरे लहान असल्यामुळे अशा रुग्णांना आम्ही नव्याने सात मजली इमारतीत सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर्समध्ये ठेवत आहोत. त्यामुळे रुग्ण लवकर कोरोनामुक्त होत असून इतरांना होणारा संसर्ग आणि प्रसार टाळला जात आहे. रुग्णांचे अशा प्रकारे योग्य व्यवस्थापन केले जात असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही आटोक्यात आहे.
– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी-उत्तर

अशी घटली रुग्णसंख्या
25 एप्रिल – 37
24 एप्रिल – 28
23 एप्रिल – 50
22 एप्रिल – 44
21 एप्रिल – 30
20 एप्रिल – 45
19 एप्रिल – 42
18 एप्रिल – 50