धारावीत कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण; बालिकानगर, मुलुंडनगर परिसर सील

1092

धारावीत शनिवारी कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडल्यामुळे धारावी परिसरातील एकूण रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. यात 30 वर्षाच्या एका महिलेचा आणि 48 वर्षाच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. या दोघांनाही शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन धारावीतील रुग्ण सापडलेले बालिकानगर आणि मुलुंडनगर हे परिसर पालिकेच्या आरोग्य विभागाने सील केले आहेत. कोरोनामुळे धारावीत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून पालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यासह तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.

धारावीत काही दिवसांपूर्वी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता. या रुग्णाची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, बालिकानगरमधील 30 वर्षीय महिलेला ताप आणि खोकल्याची लक्षणे जाणवू लागल्यानंतर तिची कोरोना चाचणी केली असता तिला कोरोना असल्याचे आढळले. धारावीतील मृत व्यक्ती किंवा अन्य कोणाच्याही संपर्कातून तिला कोरोनाची लागण झाली नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तिला शीव रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. बालिकानगरमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तपासणी शिबीर घेण्यात आले असून संशयित रुग्णांचे स्वाब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

धारावीतील मुलुंडनगर परिसरातील एका 48 वर्षांच्या व्यक्तीला कोरोना झाल्यामुळे तिला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीला कोरोनाची लागण कशी झाली, याची माहिती घेतली जात आहे. या व्यक्तीच्या जवळच्या आणि आजूबाजूच्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना धारावीतील राजीव गांधी स्पोर्ट्स संकुलातील आरोग्य केंद्रात क्वारेंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, सील करण्यात आलेल्या बालिकानगरमधील लोकांना पालिका प्रशासनातफे आज जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या