
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत रुग्ण संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण 48 दिवसांवर आले असून दरदिवशीचा ग्रोथ रेट 1.02 टक्क्यांवर आला आहे. मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या मिशन धारावीसह अनेक उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे.
धारावी हा मुंबईतील सर्वात दाट लोकवस्तीचा भाग आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाची लागण मोठय़ा प्रमाणात झाली. मात्र, पालिका, राज्य सरकारने राबवलेल्या मोहिमेमुळे तसेच मिशन धारावीमुळे कोरोनावर नियंत्रण शक्य झाले. आयसोलेशन, कोरेन्टाईन करण्यासाठी धारावीतील पालिका-खासगी शाळा, क्रीडा संकुले ताब्यात घेण्यात आली. ज्येष्ठांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्राथमिक तपासणीसाठी ऑक्सिमिटर प्लसने त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्याची मोहीम राबवली.
स्क्रीनिंगसह लक्षणे आढळल्यानंतर कोरोना चाचणी करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात नातेवाईकांना तातडीने कोरेन्टाईन करणे, कोरोना सेंटर्संमध्ये योग्य आहार, उपचार आणि शरीराबरोबर मनाच्या स्वास्थ्यासाठी योग, प्राणायाम आणि संगीतचा पहिला प्रयोगही धारावीत झाला.





























































