
कोरोनाविरोधात कोणतीही लस उपलब्ध नसताना जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शिस्तबद्ध हत्यार, त्याला टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटिंग अशा चार टी सूत्रांची जोड देत आशियातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीला कोरोनामुक्तीचा अग्रदूत बनवून जगात डंका वाजवणाऱ्य़ा धारावी पॅटर्नवर आधारित दी धारावी मॉडेल या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज प्रकाशन झाले.
वर्षा निवासस्थानी ‘दी धारावी मॉडेल’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन झाले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि पुस्तकाचे लेखक किरण दिघावकर उपस्थित होते.
The success of the ‘Dharavi Model’ is solely bcoz of sacrifices & hard work put in by many to make our #Mumbai safe again.
Through this book, I attempt to document all the highs and lows of this incredibly inspiring journey.@mybmc@CMOMaharashtra @AUThackeray #TheDharaviModel pic.twitter.com/L8pnVIEXFw— KIRAN DIGHAVKAR (@DighavkarKiran) September 14, 2021
मुंबई महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात कोरोनाला रोखण्यासाठी वापरलेल्या कार्यशैलीबरोबरच कोरोना योद्धांचे मार्गदर्शक अनुभव यात मांडले आहेत. धारावीत कोरोना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, प्रयत्नांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. धारावी मॉडेलला जागतिक पातळीवर गौरवले गेले आहे. केंद्र सरकार, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना आणि विदेशातही धारावी मॉडेलचे कौतुक केले गेले आहे. धारावी मॉडेलचा वापर इतर देशांमध्येही केला जाणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी धारावी मॉडेल पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली जी-दक्षिणचे आयुक्त किरण दिघावकर यांनी सर्वशक्तिनिशी राबवले. कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेतही सर्वात कमी रुग्णसंख्या राखत 17 वेळा झीरो पॉझिटिव्ह अशी कामगिरी धारावी मॉडेलच्या जोरावर करणे महापालिकेला शक्य झाले.
मराठीसह ई बुकमध्येही उपलब्ध होणार
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्य़ा लाटेतही धारावी मॉडेलने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. धारावीतील कोरोना व्यवस्थापनाचे अनुभव आणि आठवणी या पुस्तकात आहे. इंग्रजीतील हे पुस्तक लवकरच मराठी आणि इतर भाषांमध्ये अनुवादित होणार आहे. हे पुस्तक ई-बुक स्वरूपातदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्य़ातील वाचकांना धारावी मॉडेल सविस्तरपणे समजून घेणे शक्य होणार आहे.






























































