
धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी गेल्या 12 वर्षांत तीन वेळेस जागतिक निविदा काढूनही हा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत त्वरित योग्य निर्णय घेण्याची मागणीसाठी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
धारावी पुनर्विकासासाठी 2006 ते 2018 या काळात एकूण तीन वेळा जागतिक निविदा मागविण्यात आल्या. दोन वेळा निविदेला न मिळालेला प्रतिसाद आणि तिसऱयांदा निविदा प्रक्रियेमध्ये झालेला गोंधळ यामुळे अद्याप धारावीचा पुनर्विकास रखडला आहे. दरम्यानच्या काळात धारावीतील नागरिकांनी गृहनिर्माण सोसायटय़ांच्या मार्फत पुनर्विकासासाठी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. तसेच गेल्या 12 वर्षांत धारावीतील रस्ते, गटारे, नाले यांसारख्या पायाभूत सुविधांचा दर्जाही ढासळला आहे. सध्याच्या परिस्थितीत धारावी पुनर्विकासाला गती देण्यासाठी 2018 सालामध्ये काढण्यात आलेल्या निविदेमधील पात्र निविदाधारकांमार्फत पुनर्विकास करावा अथवा गृहनिर्माण सोसायटय़ांनी खासगी विकासकामार्फत पुनर्विकास करण्याच्या केलेल्या मागणीवर सकारात्मक विचार करावा, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.


























































