
धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) धारावी प्रकल्पात येणाऱया पात्र-अपात्र झोपडपट्टीवासीयांची प्राथमिक यादी अर्थात प्रारूप परिशिष्ट-2 नुकतेच प्रसिद्ध केली. मात्र ही अदानीची बोगस यादी असून या पहिल्याच यादीत 70 टक्क्यांहून जास्त धारावीकरांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे धारावी बचाव आंदोलन समितीचे नेते, कार्यकर्ते आणि रहिवाशांनी यादीची जाहीर होळी केली.
‘धारावी सोडून जाणार नाही’, ‘सर्वांना 500 चौरस फुटांची घरे मिळाली पाहिजे’, ‘अदानी हटाव, धारावी बचाव’ अशी जोरदार घोषणाबाजी करत शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यादरम्यान धारावी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. हे निषेध आंदोलन विभागप्रमुख-आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
आंदोलनात गणेश खाडये, जोसेफ कोळी, गंगा देरबेर, महादेव शिंदे, एस. सावंत, शेकापचे राजेंद्र कोरडे, राष्ट्रवादीचे उल्लेश गजाकोश, बसपाचे श्यामल जैसवाल, आपचे राफेल पॉल आदी सहभागी झाले होते.
डीआरपीची यादी म्हणजे अदानीची बोगस यादी. ही बोगस यादी आम्ही कधीही स्वीकारणार नाही. या बोगस यादीचे चार कागद जाळणे म्हणजे मोठा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, असा संताप माजी आमदार बाबूराव माने यांनी व्यक्त केला.
n डीआरपीच्या पात्र-अपात्र रहिवाशांच्या यादीत फक्त 108 लोकच पात्र आहेत याचा निषेध म्हणून ही यादी धारावीतील लक्ष्मीबाग शिवसेना शाखेजवळ डीआरपीची यादी जाळण्याचे निषेध आंदोलन धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी फार मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.