गुड न्यूज- धारावी बनली झीरो पॉझिटिव्ह, दिवसभरात एकही नवा रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘चेस द व्हायरस’, ‘मिशन झीरो’ तसेच राज्य सरकारने राबवलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमांना मोठे यश आले असून धारावीत शुक्रवारी दिवसभरात एकही नवा रुग्ण सापडला नसल्याने धारावी ‘झीरो पॉझिटिव्ह’ बनली आहे.

धारावीत सध्या 12 ऑक्टिव्ह रुग्ण असून त्यातील 8 जण होम क्वारंटाईन असून त्यातील 4 जणांवर कोरोना केंद्रात उपचार सुरू आहेत. गेल्या 10 महिन्यांत धारावीसह मुंबईतील ही पहिलीच घटना असून मुंबईचे कोरोनामुक्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत 1 एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 8 लाखांच्या दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता.

रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनली होती. मात्र पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्यात आला. याला चांगलेच यश आले.

पालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळेच जुलै महिन्यापासून धारावीत रुग्णसंख्या खऱ्य़ा अर्थाने नियंत्रणात आली. जुलै महिन्यात धारावीत कोरोनाचे दोन नवे रुग्ण होते तर 519 ऑक्टिव्ह रुग्ण होते.

रुग्णाच्या क्लोज कॉन्टॅक्टचा शोध घेऊन परिणामकारक क्वारंटाइन अशा उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात गरीब-गरजू कुटुंबांना रेशन वाटप करण्यात आले. या कामात पालिकेला सामाजिक संस्थांनीदेखील सहकार्य केले.

पालिकेने कोरोना रोखण्यासाठी राबवलेल्या ‘धारावी पॅटर्न’मध्ये घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, स्क्रिनिंग, ऑक्सिजन लेव्हल चेकिंग, कोविड सेंटरची उभारणी करून दिलेल्या दर्जेदार सुविधा, कोरोना हेल्थ सेंटरमध्ये लाफ्टर-योगा थेरपीसारखे प्रयोग, अद्ययावत उपचार पद्धती, संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण, सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून चार वेळा सॅनिटायझेशन करण्यात आले.

राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे परराज्यांतून पुन्हा धारावीत परतलेले श्रमिक, कामगार आणि लघु उद्योगातील कारागीर यांच्याही दोन वेळा आरोग्य तपासण्या झाल्या. त्यामुळे इतर तपासण्यांमधून राहिलेल्या एखाद्या व्यक्तीचा या मोहिमेतून शोध घेणे आणि त्याची आरोग्य तपासणी करणे शक्य झाले. त्यामुळे संशयित कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात आळा बसला.

महानगरपालिका आणि राज्य सरकारने राबवलेल्या एकत्रित मोहिमांचे हे यश आहे. धारावीत मुंबई महापालिकेच्या संपूर्ण टीमने केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. स्क्रिनिंग, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट यांच्यासह प्रत्येक टप्प्यात समाजघटकांना सामावून घेतल्यामुळेच हे शक्य झाले.’ –किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी/उत्तर