
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून आगीचे सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. धायरीतील पोकळे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. आगीत गाद्या आणि उशा बनविणाऱ्या पाच छोट्या कंपन्या जळून खाक झाल्या. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच सिंहगड अग्निशमन दल पीएमआरडीए आणि नांदेड सिटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तब्बल साडेपाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग लागल्याचे समजताच कंपन्यांमधील कामगार जीव मुठीत धरून बाहेर पळाले. काही कामगारांना नागरिकांनी खिडक्या व दरवाजे तोडुन बाहेर काढले.
कंपन्यांमध्ये लहान मुलांच्या वाढदिवसासाठी लागणाऱ्या विविध वस्तू व डेकोरेशन बनविण्यात येत होते. त्याशिवय फर्निचरचा कारखाना, गाद्या व उशा बनवणारी कंपनी अशा पाच छोट्या कंपन्याचा समावेश आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास वाढदिवसाचे डेकोरेशन बनविणाऱ्या कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. त्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीची तीव्रता लक्षात घेऊन सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी स्वतः हातात पाईप धरून आगीवर पाण्याचा मारा केला.



























































