बल्लवाचार्य धोंड्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> केशव धोंड्ये

दादरचे मराठीपण जपणारे एक महत्त्वाचे नाव. धोंडय़े केटरर्सचं वैशिष्टय़ म्हणजे अस्सल मराठी पदार्थांच्या चवीची जपणूक.

आमचा व्यवसाय वडिलोपार्जित दादर येथे सुरू झाला. माझे आजोबा नारायण गोपाळ धोंडय़े हे लोकांच्या घरी जाऊन लाडू बनवून देत व जेवणाची कामे करीत होते. त्यानंतर माझे वडील मारुती नारायण धोंडय़े यांनी या व्यवसायाचे स्वरूप बदलून 1978-79 सालापासून मेहनताना पद्धतीने ‘भाग्योदय मंगल सर्व्हिस’ या नावाने केटरिंगची कामे करायला सुरुवात करून व्यवसाय वाढवला आणि आता 20 वर्षे मी तो सांभाळीत आहे. माणसांना सोबत घेऊन उत्कृष्ट आणि रुचकर पदार्थ बनवतो. मी पारंपरिक पदार्थ बनवतो. पण आता लोकांना नव्या चवीचे पदार्थही आवडू लागले आहेत. त्यामुळे पंजाबी, गुजराथी, चाटही बनवून देतो. ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे पदार्थ पुरवतो.

उद्योजक म्हणून या व्यवसायाविषयी मी हेच सांगेन की केटरिंगचे काम चांगलेच आहे. त्यातही ते अगदी प्रामाणिकपणे केले व ग्राहकांच्या मागणीनुसार वेळेवर आणि चविष्ट पदार्थ पुरवले की ग्राहकही संतुष्ट होतात. आणि मलाही उत्तम काम केल्याचं समाधान मिळते. नवीन पिढीचा विचार करून त्यांना आवडतात तसे पदार्थही मी करण्याचा प्रयत्न करतो. सर्व पदार्थ उत्तम करणे हेच जास्त महत्त्वाचे आहे. थोडक्यात काय तर पदार्थ वेळेत होणे आणि चांगला होणे याला महत्त्व आहे. खाण्याचा संबंध आपल्या जीवनात खूप मोलाचा आहे. यामुळे माणसे जोडली जातात. या व्यवसायाकरिता घरच्या माणसांची जोड मिळतेच पण माझ्या वडिलांचे मार्गदर्शन मला मिळत गेलं. ग्राहकाला देण्याचा पदार्थ एक तास आधी आपल्याकडे तयार हवा असं त्यांचे मला सांगणे असते. तसेच शेवटची व्यक्ती जेवेपर्यंत अन्न पुरायला हवे आणि त्याची गुणवत्ताही तेवढीच जपण्याचा मी प्रयत्न करत असतो.

अस्सल महाराष्ट्रीय पदार्थात अळूची भाजी. मसालेभात, भरली वांगी तसेच वर्षातून दोनदा पाडवा आणि दसऱयाला आम्ही जिलबी विकतो. सुक्या फराळामध्ये लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळे असे पदार्थही ठेवतो. सणाप्रमाणे जे पदार्थ असतात त्याची आम्ही विक्री करतो. होळीला पुरणपोळी, संक्रातीला गूळपोळी, तिळाचे लाडू.

मराठी पदार्थांची चव जपणं ही खासियत आहे, असं ग्राहकांचं म्हणणं. यावर मी असं म्हणेन की, वडिलोपार्जित जी माणसं आमच्याकडे काम करत होती, त्यांच्या सोबत काम करणारी माणसं शिकत गेली. याकरिता कर्मचाऱयांना एखादा पदार्थ तयार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. कोणाला शिकवावं लागलं नाही. ब्राह्मणी पदार्थांसाठी वापरण्यात येणारा गरम मसाला, गोडा मसाल्यात सगळं जेवण आम्ही तयार करतो. पूर्वीची माणसं कमी झाली आहेत. तरीही आहे त्या लोकांना सोबत घेऊन काम होत आहे.

पूर्वीपासून जे सुरू आहे तेच आम्ही व्यवस्थितरीत्या सुरू ठेवलं आहे. यामध्ये विशेषकरून पदार्थाची चव पूर्वीसारखीच राखली जाणं आम्ही महत्त्वाचं मानतो, याशिवाय आपल्यासोबत काम करणारी माणसं कमी असो अथवा जास्त वेळेत सर्व पदार्थ पुरवणं, स्वच्छता राखणं, पदार्थ कमी पडू न देणं ही काळजी आम्ही आजही घेत असतो. आमच्यासाठी नवं काहीतरी सुरू करण्यापेक्षा जे आहे तेच उत्तम करणं हेच जास्त महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय तर पदार्थ वेळेत होणं आणि चांगला होणं याला महत्त्व आहे.