हाकलण्याआधीच निवृत्त हो रे बाबा! गावसकरांचा धोनीला सल्ला

टीम इंडियाला दोन विश्वविजेतीपदे मिळवून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला ‘टाइम’ आता संपला आहे. हिंदुस्थानी संघव्यवस्थापनानेही आता धोनीपलीकडे जाऊन नव्या यष्टिरक्षक फलंदाजाबाबत गंभीरपणे विचार करावा असे मत मांडताना हिंदुस्थानचे माजी कर्णधार ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांनी धोनीसारख्या महान खेळाडूने सन्मानजनक निवृत्ती स्वीकारावी असा वडिलकीचा सल्ला धोनीला दिला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर यांनी धोनीबाबत आपली मते परखडपणे मांडली. ते म्हणाले ‘धोनी संघात असणे आजही फायदेशीर आहे हे खरे आहे. तो किती धावा करतो किंवा यष्टीमागे कशी कामगिरी करतो, यापेक्षा मैदानात त्याचे असणे हे संघाच्या कर्णधाराला धीर देणारे असते. त्याच्या सल्ल्याचा मोठा फायदा होतो. असे असले तरी आता ती (निवृत्तीची) वेळ आलीय. हिंदुस्थानी संघाला दोनदा विश्वचषक विजयाचा मान मिळवून देणार्‍या धोनीने सन्मानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आता आलीय असे मला तरी वाटते.

‘धोनीच्या मनात काय आहे हे सध्यातरी कुणालाच माहीत नाही. हिंदुस्थानी क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याबद्दल केवळ तोच सांगू शकतो. पण मला वाटतं आज तो 38 वर्षांचा आहे. टीम इंडियाने आता पुढचा विचार करायला हवा. कारण पुढील टी-10 विश्वचषकापर्यंत तो 39 वर्षांचा असेल,’ असे गावसकर म्हणाले. धोनीच्या महानतेबाबत शंकाच नाही, पण वाढत्या वयामुळे प्रत्येक खेळाडूला कारकीर्दीत कुठेतरी थांबावेच लागते याचे भान धोनीने ठेवायला हवे. कुणी जा सांगण्याआधीच त्याने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी असे माझे प्रामाणिक मत आहे, असे गावसकर शेवटी म्हणाले.

न्यूझीलंड विरुद्ध पराभव होऊन हिंदुस्थानी क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यापासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. हिंदुस्थान-वेस्ट इंडीज मालिकेतूनही त्याने माघार घेतली होती. सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याचा समावेश नाही. त्यामुळे धोनीची निवृत्ती हा सध्या हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अनुभवी गावसकर यांचे हे मत महत्त्वाचे मानले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या