धुक्यामुळे धुळेकर अनुभवतायत महाबळेश्वरचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वातावरणातील बदलांमुळे दिवसा आणि रात्री हलकासा पाऊस होत आहे. त्याचा परिणाम सकाळी दाट धुक्यात होत आहे. शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रामप्रहरी दाट धुके पसरते. त्यामुळे सूर्येदयाच्या वेळीच वाहनाचे दिवे लावून मार्गस्त होण्याची वेळ अनेकांवर आली आहे. आकाशात दाटलेले ढग आणि आजूबाजूला धुक्याची दाट चादर हे वातावरण अनुभवताना अनेक जण महाबळेश्वरमधील वातावरणाची अनुभूती घेत आहेत.

सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यात वातावरण सर्वसामान्य असते. गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे धुळे जिल्हा प्रखर ऊन अनुभवत आहे. मागील सात ते आठ वर्षांत शहर आणि जिह्याच्या तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याची नोंद आहे. तापमान वाढल्यामुळे उन्हाळय़ात जीवन जगणे सजिवांना कठीण होऊ लागले. असे असताना गेल्या चार वर्षांत थंडी बेपत्ता झाली, परंतु यंदा वातावरणात कमालीचा बदल झाला. पावसाळय़ाचा कालावधी लांबला. पाऊस जास्त झाला. आता हिवाळा अनुभवण्याची वेळ असताना पावसाळी वातावरण अनुभवले जात आहे. दिवसभर आकाशात ढगांची गर्दी, अधूनमधून होणारा हलकासा पाऊस यामुळे सर्वांसाठी संदिग्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना रामप्रहरी मात्र सूर्यकिरण येण्यापूर्वी सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरते. दहा फुटांच्या पलीकडचे सहज दृष्टीक्षेपात येत नाही. शहर आणि परिसरातील वातावरण सध्या महाबळेश्वरमधील वातावरणाची अनुभूती देत आहे.