
शहरासह जिल्हय़ाच्या तापमानाचा पारा सहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. त्यामुळे जिल्हय़ाला हुडहुडी भरली आहे. सलग दोन दिवस तापमान सहा अंश सेल्सिअसवर स्थिरावल्याने निर्माण झालेल्या गारठय़ाचा विपरित परिणाम झाला आहे. सायंकाळी उशिराने आणि सकाळी अनेक जण गरम कपडय़ांबरोबरच ठिकठिकाणी असलेल्या शेकोटय़ांजवळ काही काळ थांबत आहेत. लांबलेला पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे ऑक्टोबर महिन्यात जाणवणारी थंडी यंदा चक्क डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात जाणवण्यास सुरुवात झाली.
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट पसरली. ही लाट सातपुडा भेदून धुळे जिल्हय़ात आली. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी सर्वसामान्य तापमान असताना अचानक दोन दिवसांपासून तापमान सहा अंशापर्यंत घसरले. तापमानाचा पारा घसरण्यापूर्वी तीन दिवस शहरासह जिल्हय़ात रिमझिम पाऊसदेखील झाला. पुढील काळात तापमानाचा पारा आणखी घसरू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साहजिकच संपूर्ण जिल्हय़ाला हुडहुडी भरली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तिबेटीयन व्यावसायिकांकडील गरम कपडे घेण्यासाठी आता गर्दी झाली आहे. गोठय़ातील जनावरांचेदेखील थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून जनावर मालकांनी गोणपाटांचा आधार घेतला आहे.




























































