
सामना प्रतिनिधी, धुळे
हिमालय पर्वतावर प्रचंड प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धाकडे वाहणाऱया वाऱयांनी थंडीची लाट आणली आहे. त्यामुळे धुळे शहरात 18 वर्षांनंतर 29 डिसेंबरला सकाळी 2.2 अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली आहे. थंडीच्या या लाटेने संपूर्ण जिल्हा गारठला आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र रब्बी हंगामातल्या गहू, हरभरा या पिकांना ही थंडीची लाट पोषक असल्याचे जाणकार सांगतात.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हय़ाच्या तापमानाचा पारा घटत आहे. एरव्ही 45 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करणाऱया धुळेकरांना तापमान 15 ते 20 सेल्सिअसपर्यंत कमी झाले तरी सुखद वातावरणाचा अनुभव येतो. परंतु नैसर्गिक बदलामुळे आता धुळेकर प्रचंड गारठा अनुभवत आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱया वाऱयांवर खान्देशातील भौगोलिक परिस्थिती अवलंबून आहे. अशा परिस्थितीत हिमालयाकडील बर्फवृष्टी अंगावर घेत दक्षिणेकडे येणारे वारे खान्देशाला गोठावण्याचा प्रयत्न करीत आहेत. धुळे कृषी महाविद्यालयात वेधशाळा आहे. या वेधशाळेतील प्रा.पंकज रवंदळ यांनी सांगितले की, उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धाकडे वाहणारे वारे प्रचंड थंड आहेत. त्याचवेळी सूर्य दक्षिण गोलार्धाकडे दूरवर गेला आहे. त्यामुळे उष्णता कमी झाली आहे.
पुढील 10 दिवस वातावरण असेच राहणार
यापूर्वी 12 जानेवारी 2017 ला धुळय़ात 4.4 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर 27 डिसेंबरला यंदा 3.2 अंश सेल्सिअस आणि 28 डिसेंबरला 2.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ढगाळ वातावरण झाले तरच थंडी कमी होऊ शकेल. पण पुढील दहा दिवस वातावरण असेच राहील. आकाश निरभ्र राहणार असल्यामुळे तापमान असेच कमी राहील, असे प्रा.पंकज रवंदळ यांनी सांगितले.






























































