धुळ्यात दहा दिवसांच्या नवजात बालकाने मिळवला कोरोनावर विजय

कोरोना संक्रमणाच्या दुसऱया लाटेत धष्टपुष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाने आपल्या कवेत घेतल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि अनेकांच्या मनात धडकी भरली. पण त्याचवेळी धुळे शहरात कोरोनावर नवजात बालकाने विजय मिळविल्याची दिलासादायक घटना घडली आहे.

धुळे शहरातील डॉ. अभिनय दरोडे यांच्या दवाखान्यात 13 दिवसांपूर्वी महिलेने बाळाला जन्म दिला. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे साहजिकच गर्भात असलेल्या बाळालादेखील कोरोनाशी संघर्ष करावा लागला. जन्मल्यानंतर दुसऱया दिवसापासून नवजात बाळाला त्रास होऊ लागला. बाळाला रक्ताच्या गाठी तयार होऊ लागल्या, रक्तदाब अनियमित झाला, फुप्फुस कमी-अधिक प्रमाणात कार्यरत होऊ लागले, किडन्यांना सूज आली. तर दोन वेळा हृदयाची गतीदेखील थांबली. अशा बिकट परिस्थितीत या बाळावर उपचार करण्यात आले. सलग दहा दिवसांच्या उपचारात या बाळाने सर्व आजारांवर विजय मिळवला.

नवजात बाळाचा कोरोना संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. कोरोनाचे संक्रमण झाले असेल तर प्रबळ इच्छाशक्ती कशी असावी हे या नवजात बाळाकडे पाहून सर्वांच्या लक्षात यावे. – डॉ. अभिनय दरोडे

आपली प्रतिक्रिया द्या