
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सर्व सामान्य माणसांना सरकारच्या नाकर्तेपणामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात भर म्हणून सरकारी कर्मचारी सुद्धा सरकारच्या खांद्याला खांदा लावत सर्व सामन्यांना लुटण्यात हातभार लावत आहेत. असाच प्रकार धुळे जिल्ह्यात घडला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक शुभम देव याला लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. त्याने कर्जाच्या व्याज परतव्याचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यासाठी पाच हजार रुपायंची लाच मागितली होती.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून तक्रारदाराने कर्ज घेतलं होतं. तसेच कर्जाची परतफेड सुद्धा केली. व्याजाची रक्कम त्यांना परत मिळावी यासाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मगाास विकास महामंडळाच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक शुभम देव याची भेट घेतली. यावेळी शुभम देवने संधी साधत तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच मागीतली. कारण व्याज परताव्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठवायचा होता. तक्रारदाराने तात्काळ याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुभम देव याला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.