धुळे – निवडणुकांसाठी बाजारात प्रचार साहित्य विक्रीला

805

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत असल्याने व्यावसायिकांनी राजकीय पक्षांचे झेंडे, जाहीरनामे, बिल्ले, स्कार्प, मतदान यंत्राच्या प्रतिकृती बाजारात आणल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी माघारीची मुदत 30 डिसेंबरला आहे. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. पण निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार असतीलच अशी खात्री असल्याने व्यावसायिकांनी पक्षाच्या झेंडय़ासह निरनिराळे प्रचार साहित्य विक्रीस आणले आहे. साहित्य खरेदीला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

धुळे जिल्हा परिषदेच्या 56 आणि जिह्यांतील चार पंचायत समित्यांच्या 112 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. छाननीअंती उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 533 तर पंचायत समित्यांच्या 112 जागांसाठी 828 इच्छुक आहेत. मात्र माघारीची मुदत 30 डिसेंबरला दुपारी 3 ला संपणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत अनेक राजकीय तडजोडी होतील आणि उमेदवारांची गर्दी कमी होईल. साहजिकच प्रमुख पक्ष आणि इतर प्रबळ इच्छाशक्ती असणाऱयांकडून अद्याप प्रचाराला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. परंतु उमेदवारीचा निर्धार केलेल्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. धुळे शहरात प्रचार साहित्य घेऊन विक्रेते स्थिरावले आहेत. त्यांच्याकडून निरनिराळय़ा प्रकारचे प्रचार साहित्य खरेदी केले जात आहे. अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नाही, पण माघारीनंतर प्रचाराला सुरुवात होईल आणि उमेदवारांकडून प्रचार साहित्याची खरेदी होईल असा आशावाद व्यावसायिकांना आहे.

नाशिक येथून निरनिराळय़ा राजकीय पक्षांचे झेंडे, स्कार्प, बिल्ले, मतदान यंत्राची प्रतिकृती, राजकीय नेत्यांचे फ्लेक्स, वचननामा तयार करण्यासाठी रेकार्ंडग साहित्य घेऊन विक्रेते आले आहेत. शहरातील महाराणा प्रताप चौकात विक्रेते स्थिरावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या