
सोमवारी होलिकोत्सवाच्या पवित्र अग्नीमध्ये ‘इडापिडा टळू दे आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, सुखशांती येऊ दे’ अशी प्रार्थना केल्यानंतर आज अवघी मुंबई धुळवडीच्या रंगात न्हाऊन निघाली. आबालवृद्धांचा उत्साह, तरुणाईचा जल्लोष, रंगाने माखलेले चेहरे, जोडीला तालासुरांची साथ, बेधुंद ठेका आणि मनसोक्त रंगांची उधळण… असा रंगारंगी माहौल मुंबईसह राज्यभरात होता. गावोगावी पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव झाला. मुंबईच्या अनेक भागांत या प्रथापरंपरांचे दर्शन झाले.
यंदा होळी आणि चंद्रग्रहण असा दुर्मिळ योग जुळून आला. मंगळवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी ग्रहण सुरू झाले. त्याआधी रंगपंचमी खेळण्याकडे बहुतांश जणांचा कल राहिला. शहरभर रंगपंचमीचे सप्तरंगी तरंग उमटले. सकाळपासूनच धुळवडीला सुरुवात झाली. चाळी, सोसायटय़ांमध्ये जल्लोष दिसून आला. काही सोसायटय़ांमध्ये रेन डान्सही आयोजित करण्यात आले. पाण्याचे हौद तयार ठेवण्यात आले. पर्यावरणप्रेमींकडून ओल्या रंगाऐवजी सुक्या आणि इकोफ्रेंडली रंगाचा पर्याय निवडण्यात आला. रस्त्यारस्त्यावर, गल्लोगल्ली, चौकाचौकात रंगलेले चेहरे, मुला-मुलींचे ग्रुप, पिचकाऱया घेऊन फिरणारी बच्चेपंपनी असे दृश्य दिसत होते. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तरुणाईने मोठय़ा प्रमाणात एकत्र येऊन धुळवड रंगवली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात होता. मुंबईच्या काही भागांत नाकाबंदी करण्यात आली.
शाकाहारावर समाधान
होळीनिमित्त घरोघरी पुरणपोळीचा बेत रंगला. रंगपंचमीला मंगळवार आल्याने अनेकांना सामिष भोजनाचा बेत बाजूला सारून शाकाहारावर समाधान मानावे लागले. नैसर्गिक पद्धतीने होळी साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अनेकांनी नैसर्गिक रंग आणि झाडे न तोडता पर्यावरणपूरक पद्धतीने सामाजिक संदेश देत होळी साजरी केली.
पारंपरिक सेलिब्रेशन
मुंबईतील जुन्या वाडय़ा, वस्त्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा झाला. कोळी बांधवांनी प्रथा-परंपरेने शिमगा साजरा केला. पारंपरिक वाद्यांवर ठेका धरला. वरळी जेट्टी येथे कोळीबांधवांनी आपल्या बोटी सजवल्या. माहीमच्या मच्छीमार कॉलनीत पारंपरिक उत्साह दिसून आला.
चौपाटय़ा फुलल्या, कट्टा सजला
तरुणाईने समुद्राच्या साक्षीने रंगांचा सण साजरा केला. गिरगाव, दादर, जुहू चौपाटय़ांवर तरुणांनी गर्दी केला आणि उत्साह द्विगुणित केला. रंगात माखलेले ग्रुप चौपाटय़ांवर दिसत होते. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा कट्टाही फुलून गेला. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये सिनेकलाकारांनी उत्साहाची धुळवड साजरी केली.




























































