दिल्ली सामूहिक आत्महत्या प्रकरणात अंधश्रद्धेची पानं, मोक्षप्राप्तीसाठी दिला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी एकाच घरातल्या ११ जणांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. अनेक तर्क-वितर्क काढल्यानंतर पोलिसांनी ही सामूहिक आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला. याच प्रकरणाचा पुढील तपास करताना काही महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. ज्यामुळे तपासाला योग्य ती दिशा मिळेल असा पोलिसांना विश्वास आहे. पोलिसांच्या हाती एक डायरी लागली आहे.

ललित भाटिया यांचे संपूर्ण कुटुंब अतिशय धार्मिक होते. तसेच कर्मकांड, अंधश्रद्धा यावरही त्यांचा विश्वास होता. पोलिसांच्या हाती लागलेल्या डायरीत भाटिया कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेबाबत माहिती मिळाली आहे. डायरीत नमूद केल्याप्रमाणे, भाटिया घरातील मुख्य सदस्य ललित भाटिया व भुवनेश (भुपी) यांनी मिळून एका विशेष साधनेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा समावेश होता. साधनेसाठी चार दिवस निश्चित करण्यात आले. मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार हे ते चार दिवस होते. त्यातही शनिवार-रविवारच्या रात्रीला ही विशेष महत्त्व असल्याचं या डायरीत म्हटलं आहे.

तसंच या डायरीनुसार, शनिवारी रात्री एक वाजता हात-पाय, तोंड धुऊन या साधनेस बसण्यास सांगितलं होतं. मोबाईलचा अडधळा नको म्हणून मोबाईल देवघरात ठेवण्यास सांगण्यात आले होते. यानंतर स्वतःचे हातपाय स्वतःच बांधणे, घरातील वृद्ध व्यक्तींना दुसऱ्या खोलीत साधना करण्याची मुभा असणे, साधना करताना चेहऱ्यावर दुःख किंवा तणाव न ठेवणे, हातपाय बांधण्यासाठी कोणती साडी अथवा ओढणी वापरावी याचा उल्लेख इत्यादी बाबी या डायरीत नमूद केल्या आहेत. यामुळे हे कुटुंब किती अंधश्रद्धेच्या आहारी गेलं होतं हे स्पष्ट होते. यातूनच या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.