
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईसह नवी मुंबई व आसपासच्या जिह्यात पोलीस कोठडी, कारागृहात अथवा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्या आरोपीचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयातच करावे, असे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. आरोपीचे शवविच्छेदन करताना व्हिडीओ चित्रीकरणही करण्याचे आदेशात नमूद केले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिह्यातील पोलीस कोठडी, कारागृह अथवा पोलिसांच्या ताब्यात असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय, जे. जे. रुग्णालयात करण्यात यावे असे शासकीय आदेशात नमूद केले आहे.
राज्यातील अकोला, कोल्हापूर, लातूर, चंद्रपूर, गोंदिया व जळगावमध्येही हाच नियम लागू केला आहे. या चार जिह्यांतील पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्यांचे पोस्टमॉर्टम शासकीय रुग्णालयात होते, पण या जिह्यातील शासकीय रुग्णालये दूर असल्याने पोस्टमॉर्टमला विलंब होतो. त्यातून अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते. त्यामुळे या चार जिह्यांतील पोलीस कोठडीत किंवा कारागृहात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पोस्टमॉर्टम शासकीय महाविद्यालयात करण्याचेही आदेश जारी झाले आहेत.
व्हिडीओ चित्रीकरण करावे लागणार
पोस्टमॉर्टम करताना त्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे, या व्हिडीओ चित्रीकरणाची सीडी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला पाठवण्यात यावी, ही सीडी मानवी हक्क आयोगाला पाठवण्याची जबाबदारी शासकीय महाविद्यालयातल्या न्यायवैद्यक पॅथॉलॉजिस्टची (फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्टचा) राहील. शवविच्छेदन करताना न्यायवैद्यक पॅथॉलॉजिस्टनी दोन ते तीन डॉक्टरांच्या पॅनलच्या उपस्थितीत करावे. व्हिडीओ चित्रीकरणाचा खर्च डीननी करावा. पुढे हा खर्च संबंधित पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक किंवा कारगृह विभागाकडून वसूल करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.
पोलीस कोठडीत किंवा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्युमुखी पडलेल्या आरोपीचे शवविच्छेदन करताना ज्या ठिकाणी न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) विभाग आहे अशा शासकीय महाविद्यालयात पोस्टमॉर्टम करण्याची पद्धत राज्यात आहे. हीच पद्धत मुंबईतही सुरू करावी, असे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.



























































