कोरोना काळात असा घ्या आहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अशा काळात आपण आपली काळजी घेतली पाहिजे. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी चांगला आहार घेणे गरजेचे आहे. पौष्टिक आणि समतोल आहारामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो. यासाठी कोरोना काळात कोणता आहार घ्याल?

जीवनसत्त्व, फायबर, प्रथिने आणि अँण्टिऑक्सिडंटयुक्त ताजी फळे या दिवसात खाणे फायदेशीर ठरते. शिवाय हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला पोषक तत्वे मिळतात. रताळे, बटाटा, सुरण अशा कंदवर्गीय भाज्यांचाही आहारात समावेश करावा.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. यासाठी पाणी पिण्यासोबतच काकडी, कलिंगड, अननस अशी शरीराला थंडावा देणारी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळे खा.  मांसाहार करणारे लोक आठवड्यातून दोन-तीन वेळा मांसाहाराचा समावेश आहारात करू शकतात.

दिवसभरातल्या आहारात जेवणासोबत फळांचाही समावेश असू द्या. विविध प्रकारच्या भाज्या, मांसाहारी पदार्थ, फळे, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये, शिवाय गूळ, तूप, ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी असा शरीराला पोषक असणारा आहार या दिवसांत घ्यावा.

काय खाणे टाळाल ?
मैदा, साखरेचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर यांसारखे जंकफूड, जास्त मीठ असलेले पदार्थ, प्रोसेस फूड, फास्ट फूड असे पदार्थ सध्याच्या कोरोना काळात खाणे टाळा. शिवाय ज्यांना रक्तदाब, ह्रदयविकार, मधुमेह या प्रकारचे आजार असतील त्यांनी आपल्या आहाराकडे, पथ्यपाण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.