
> प्रो. डॉ. शशिकांत लोखंडे
कथा लेखकाचे कर्तृत्व यात असते की तो जी स्वभावचित्रे, व्यक्तिचित्रे, जीवनचित्रे आपल्या कथा लेखनातून आविष्कृत करीत असतो ती प्रामुख्याने कल्पनेतून निर्माण होत असली तरी तिची आधारभूमी प्रत्यक्ष वास्तवाचीच आहे. एका वेगळय़ा जैविक संघर्षात वावरत असलेली ही कथेतील माणसे लेखकाला हादरवून टाकतात. ‘हेच अरविंद बुधकर यांच्या डोहाचे अंतरंग’ या पहिल्यावहिल्या कथासंग्रहाबद्दल सांगता येईल.
‘डोहाचे अंतरंग’ हे संघर्षात लिप्त झालेल्या सजीवाचे आहे. व्यवसायाने ‘व्यवस्थापन’ आणि कामगार क्षेत्रातील ‘एक कार्यकर्ता’ म्हणून अरविंद बुधकर यांचा अनेकांशी संबंध आला आहे. स्वतः अनेक संघर्षमय वास्तवातून परिक्रमा करताना त्यांना अन्य अनेक मानवी मनाचे डोह व त्यातील दुःखाची घालमेल अनुभवता आली आहे. ‘डोहाचे अंतरंग’ संग्रहातल मानवी मनाची संघर्षाची बाजू या कथांमध्ये जास्त पकड घेणारी आहे. या संग्रहातील 15 कथा म्हणजे केवळ दुःखाचे नमुने नसून वेगवेगळय़ा मानवी संघर्षाची अतर्क्य रूपेच आहेत, असे म्हणावे लागेल. मध्यमवर्गीय जीवन कल्पनेचे आविष्करण येथे सहजगत्या येते. तरीही पानांवर असणारे चेहरे हे केवळ त्यांचेच नसून यामध्ये समाजातील सामान्यांच्या चेहऱयाशी मिळतेजुळते असे आहेत. ‘डोहाचे अंतरंग’ म्हणजे वळण, स्मृतिचिन्ह, रिंकू, आव्हान, उतराई, कोंडी, गरुडझेप, जिद्द, नाते माणुसकीचे, भोवरा लग्न, पेंटर, निरोप समारंभ, भाग्यश्री – अशा कथांचे मध्यमवर्गीय जीवन भेदक चित्रण आहे. सर्वसामान्य दृष्टीने या कथा त्यामुळेच वाचनीय झाल्या आहेत.
विवाहाबाबतचे वैफल्य, फसवणूक ‘वळण’ कथेत येते. सुरेशच्या मनावर दिलीपने घेतलेला निर्णय कसा आघात करून गेला, दिलीप अमेरिकन मुलीशी लग्न करतो हे सुलभालाही धक्का कसा देते. या कथेतील शोकांतिका वाचकांच्या मनाला चटका लावणारी आहे.
‘वसंत’सारख्या व्यवस्थापकाने कामगाराच्या दोन बायकांनाही न्याय मिळवून देऊन एका कुटुंबाचे घर कसे उभे केले याचे विलक्षण चित्रण ‘स्मृतिचिन्ह’मध्ये आहे. ही एक अतिशय चांगली कथा आहे. माणुसकीचे दर्शन उत्कट आहे आणि कथेतील नामक ‘वसंत’ काही कामगारांना बरोबर घेऊन मृत कामगाराला अग्नी देतो. कामगाराच्या दोन बायकांना कायदेशीर देणी मोठय़ा कष्टाने राजी करून विभागून दिल्यानंतर कंपनीचे स्मृतिचिन्ह चांदीचे नाणे अर्धेअर्धे करून घ्या अशी मागणी झाल्यावर चुकीची प्रथा पडू नये म्हणून वसंताला खंबीर भूमिका घ्यावी लागते. परदेशातील जीवनामधील ‘एकाकीपण’, ‘रिंकू’ या कथेतील रिंकूच्या वाटय़ाला येते. परदेशीय मायावी जग जीवनाची कशी होरपळ करते आणि नात्यातील ओलावा कसा संपवून टाकते, हे वाचताना वाचक अंतर्मूख व्हावा अशीच या कथेची रचना आहे. कोसळणाऱ्या राधिकेचे जीवन अतुलने अतुलनीयरीत्या कसे सावरले हे ‘आव्हान’ या कथेत आहे. मनात परस्त्रीकडे मानसिक आधार शोधते हेही दुःखाचे एक कारण राधिकेच्या जीवनातील ‘आव्हाना’चे आहे. उतार वयातील एकांकीपणाचे दुःख ‘विलक्षण’ असते. यशवंतरावांचे निधन झाल्यानंतर अनुराधा साथी शिवाय राहू न शकल्याने ती गजाननशी पुनर्विवाह करते तेव्हा कुटुंबीयांत काय घडते याचे चित्रण ‘उतराई’ कथेत आहे.
या सर्व कथा पाहताना काही वैशिष्टय़े दिसून येतात. ते म्हणजे या कथामध्ये ‘दुःख’ हे केंद्रस्थानी आहे, विशेषतः कथेतील स्त्रीच्या जीवनातील वास्तवाचे दर्शन घडते. यातील कुटुंबाच्या, विवाहाच्या,आर्थिक हलाखीच्या वास्तवातील घटितांचे अगदी योग्य पद्धतीने लेखकाने चित्रण केले आहे.
या संग्रहातील प्रत्येक कथा स्वतंत्र असली तरी प्रत्येक कथेचे बाकीच्या कथांशी काही ना काही नाते आहे. हे विशेष होय, या सर्व कथा प्रामुख्याने शहराच्या परिसराशी संबद्ध आहेत. त्यातील कुटुंबांच्या संबंधात येणाऱ्या विविध व्यक्ती व त्या व्यक्तींचा जीवनसंघर्ष याचे दर्शन म्हणजे ‘डोहाचे अंतरंग’ हे शीर्षक प्रतिकात्मक आहे. एका कथेतील व्यक्ती दुसऱ्या कथेतही दिसत असल्या तरी या पलीकडे त्या कथांचे परस्परांशी परिणामाच्या दृष्टीने काही नाते आहे असे अनुभवास येते. पंधरा कथांमधून काही व्यक्तींच्या जीवन संघर्षाचे चित्रण येथे आहे.
व्यक्ती आणि त्याने जीवन संघर्ष यातून या कथांचा आकृतीबंध शैलीदार झाला आहे. ‘वर्णना’पेक्षा ‘घटित दर्शन’ हे या कथांचे सामर्थ्य आणि मर्यादा आहे. म्हणून वाचकांनी या कथा आवर्जुन वाचल्याच पाहिजेत, अशा ताकदीच्या ‘डोहाचे अंतरंग’ समजून घेतलेच पाहिजे.
डोहाचे अंतरंग
लेखक ः अरविंद रा. बुधकर
प्रकाशक ः मायबोली प्रकाशन, मुंबई
पृष्ठs ः 138, मूल्य ः रुपये 72/-

























































