
कोयंबतूर परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक सी.विजयकुमार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. रेस कोर्स परिसरातील आपल्या कार्यालयातच त्यांनी आपल्यावर गोळी झाडून घेतली. सकाळी फिरायला निघालेले विजयकुमार 6.45 च्या सुमारास कँप ऑफिसमध्ये आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याकडे त्याची पिस्तुल मागितली होती. सकाळी 6.50 च्या सुमारास त्यांनी या पिस्तुलातून स्वत:वर गोळी घाडून घेत जीव दिला. या घटनेनंतर तिथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली.
विजयकुमार यांनी 6 जानेवारी 2023 रोजी कोयंबतूर परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला होता. एमएस मुत्थूस्वामी यांची वेल्लोर परीक्षेत्रात बदली झाल्याने विजयकुमार यांची या परीक्षेत्रात बदली करण्यात आली होती. 2009 सालचे आयपीएस असलेल्या विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डलोर, नागापट्टीनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकपद सांभाळलं आहे. चेन्नईच्या अन्नानगरचे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांना पोलीस उपमहानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली होती.



























































