कोविड व्यवस्थापनात सरकार अपयशी; दिगंबर कामत यांचा आरोप

गोव्यात भाजप सरकारकडे कोविड व्यवस्थापनाचा कोणताही कृती आराखडा नाही. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कोविड रुग्णांवर उपचार करणारी सर्व रुग्णालये भरल्याचे सांगत, कोरोनाबाधितांना घरातच विलगीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता जनतेचे रक्षण केवळ परमेश्वरानेच करावे, अशी वेळ आल्याचे सांगत सरकारच्या धोरणावर विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग कार्यान्वित करावे आणि रुग्णालयाबाबत लोकांच्या मनात असलेल्या शंकाना पूर्णविराम द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रुग्णालयातील आरोग्यसेवा लोकांना मिळणे ही गरज आहे, असे कामत यांनी म्हटले आहे. सरकारने चुकीच्या धोरणांनी जनतेला कोविड संकटात ढकलले आहे. 40 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात कोविड परिस्थिती हाताळण्याबाबत कोणतीच तयारी सरकारने केली नाही, हे आताच्या अनागोंदी कारभाराने स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही कामत यांनी केली आहे. गणेशोत्सव साजरा करुन कोरोनाचा संसर्ग पसरवला असे सांगत जनतेला जबाबदार धरणाऱ्या सरकारकडे कोविड व्यवस्थापनचा कोणताही कृती आराखडा नाही, असा आरोप कामत यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या