गोमंतकीय निर्मात्यांवरील अन्याय दूर न झाल्यास इफ्फी दरम्यान आंदोलन, कामत यांचा इशारा

यंदा होणाऱ्या 50व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘इंडियन पनोरमा’ विभागात एकाही गोमंतकीय चित्रपटाचा समावेश न केल्या बद्दल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी ताबडतोब यात लक्ष घालून गोमंतकीय चित्रपटांचा समावेश इफ्फिच्या अधिकृत विभागात करावा अशी मागणी कामत यांनी केली आहे.

ट्वीटकरून दिगंबर कामत यानी आपला असंतोष व्यक्त करताना इफ्फिच्या आयोजनात 2012 नंतर गोवा सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. आपण मुख्यमंत्री तसेच गोवा मनोरंजन संस्थेचा अध्यक्ष असताना आमच्याकडे पाच अधिकृत विभागांची जबाबदारी व अधिकार होते. गोमंतकीय सिने निर्मात्यांचे अधिकाधीक चित्रपट इफ्फिमध्ये प्रदर्शित करण्यावर आम्ही भर दिला होता, याची आठवण कामत यांनी करून दिली आहे.

तत्कालीन काँग्रेस सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनी यानी गोमंतकीय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ‘गोवा ऑन सेल्युलॉयड”हा खास अधिकृत विभाग तयार करून त्याची जबाबदारी मनोरंजन संस्थेकडे दिली होती, याचीही आठवण कामत यांनी करून दिली आहे. यंदा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिनेश भोसले यांच्या ‘आमोरी’ या चित्रपटाला इंडियन पॅनोरमा विभागात स्थान देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यापुर्वी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले सर्व गोमंतकीय चित्रपट इफ्फित प्रदर्शित करण्यात आले आहेत याची सरकारने नोंद घेणे गरजेचे आहे,अशी मागणी कामत यांनी केली आहे.

गोमंतकीय सिने निर्माता राजेश पेडणेकर यांचा ‘ काजरो’ हा चित्रपट ‘मामि’ चित्रपट महोत्सवात निवडण्यात आला होता. दिलीप बोरकर व शामराव यादव यांचा ‘बडे अब्बू’ हा चित्रपट झारखंड राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. या सर्व चित्रपटांना इफ्फिच्या अधिकृत विभागांत स्थान देणे गोवा सरकारची जबाबदारी आहे, असे सांगून कामत म्हणाले की, गोवा सरकार व मनोरंजन संस्थेने ताबडतोब गोमंतकीय सिनेनिर्मात्यांवर झालेला अन्याय दूर करावा. सरकारने योग्य पावले न उचलल्यास आगामी इफ्फिवेळी गोमंतकीय सिनेनिर्मात्यांसोबत निदर्शने करण्यास मागे पुढे पाहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावे, असा इशारा कामत यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या