डिजिटल अटक करून 15 लाखांचा चुना; सांगलीतील तरुणाला अटक

दिल्ली पोलीस मुख्यालयातून आम्ही बोलतोय. एका मनी लॉंडरिंग प्रकरणात हसिना पारकर व अन्य आरोपींसोबत तुमचेही नाव असल्याची भीती दाखवत डिजिटल अटक करून सायबर गुन्हेगारांनी 15 लाखांचा चुना लावला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी सांगलीतील तरुणाला अटक केली.

सुशिला (61, नाव बदललेले) यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर फोन आला. एकाने एसपी गोपेश कुमार, तर दुसऱ्याने डीएसपी भुपेश कुमार अशी आपली ओळख सांगत ते दिल्ली पोलीस मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगत अटकेची भीती दाखवली. इतकेच नाही तर सीबीआयच्या लेटरवर सही, शिक्क्यानिशी बनावट अटक ऑर्डर व अन्य कागदपत्रे पाठविण्यात आली. मग फंड व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यांनी एक बॅंक खाते क्रमांक देऊन त्यावर 15 लाख रुपये पाठविण्यास सांगितले व त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात 15 लाख फेडरेल बँकेच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे व त्यापैकी पाच लाख बँक ऑफ बडोदामधील एका खात्यात वळते झाल्याचे समोर आले. ही रक्कम सांगलीच्या तांदळगाव येथे राहणारा विकास चव्हाण याने काढल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला पकडले.