यंदाच्या निवडणूक चिन्हांवर डिजिटल माध्यमांचा प्रभाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा निवडणूक चिन्हांमध्ये लॅपटॉपपासून माऊस, पेनड्राइव्ह, रोबोट आणि सुरक्षेचा संदेश देणाऱया हेल्मेटचा समावेश करण्यात आला आहे. यंदा 198 निवडणूक चिन्हे उपलब्ध करून दिली असून त्यावर डिजिटल माध्यमाचा प्रभाव दिसून येत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारासांठी 87 निवडणूक चिन्हे घोषित करण्यात आली होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून त्यात नव्या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. यंदा त्यात दुपटीने वाढ करण्यात आली असून यंदा 198 चिन्हे उपलब्ध करून दिली असून त्यातून एक निवडणूक चिन्ह निवडण्याचा पर्याय दिला आहे.

शेती व शेतकऱयाला मान देणारी चिन्हे
या चिन्हांमध्ये ऊस व शेतकरी (गन्ना किसान), नारळाची बाग, डिझेल पंप, ट्रक्टर चालवणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश करून शेतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

टुथपेस्टपासून रेझर
प्रत्येकाच्या वापरातील टुथब्रश, टुथपेस्टपासून रेझर, साबणदाणी, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंचाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे.

हेल्मेटद्वारे सुरक्षा संदेश
मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करून निवडणूक आयोगाने दुचाकीस्वारांच्या जिवाच्या रक्षणासाठी एक सामाजिक संदेशही दिला आहे.

नव्या जुन्यांचा मिलाफ
जुन्या काळातील वाळूचे घडय़ाळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाइपरायटर, डिझेल पंप आणि आधुनिक काळातील लॅपटॉप, माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राइव्ह, रोबोट, हेडफोन अशा नव्या जुन्याचा संगम या म्क्तु चिन्हांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सिलिंडरपासून भाज्यांपर्यंत
गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, फ्रीज, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, फ्राइंग पॅन, काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ, शिमला मिरची, फुलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे,नासपती, फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक निवडणूक चिन्ह म्हणून दिले आहे.

हार्मोनियम ते सतार
यासोबत रिक्षा, ट्रक, हेलिकॉप्टर,जहाज, रस्ता, विटा, थापी, करवत, कडी, कुलपाची चावी, बॅट, बुद्धिबळपट, कॅरम बोर्ड, ल्युडो, स्टंप, हॉकी स्टीक, बॉल, टेनिस रॅकेट आणि बॉल तसेच क्रिकेट फलंदाज, फुटबॉल खेळाडू, मोत्याचा हार, हिरा, अंगठी, सतार, हार्मोनियम यांचा निवडणूक चिन्हांमध्ये करण्यात आला आहे.