
>> दिलीप देशपांडे
आपण एका दिवसापुरता जागतिक व्याघ्रदिन साजरा करतो. मग त्याचा विसर पडतो. वाघ ही जंगल संपत्ती आहे. त्याची जपणूक व्हायला हवी. वाघांशिवाय जंगलाची पूर्णतः नाही. 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा उद्देश हाच की, वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करून जनजागृती करणे. जेणेकरून वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढणार नाही. त्यामुळेच वाघांचे जंगलातले अस्तित्व टिकून राहणार आहे.
वाघ आणि माणूस यांच्यातला संघर्ष हा काही नवीन नाही. त्यामुळे वन विभागासमोर हा संघर्ष रोखण्यासाठी मोठे आव्हान असते. बऱयाच वेळा वाघाच्या हल्ल्यात अनेक माणसांचे बळी जातात. याला कारण म्हणजे मोठय़ा प्रमाणात होणारी जंगलतोड आणि त्यामुळेच त्याचा अधिवास मोठय़ा प्रमाणात नष्ट होत आहे. वाघाला संचार मार्गासाठी दाट जंगलाची आवश्यकता असते. पर्यायाने त्याचा जंगलाचा अधिवास कमी झाल्याने नकळत तो मानवी वस्तीकडे वळतो. मुद्दाम माणसांवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू नसतो असे म्हणायला हरकत नाही. 29 जुलै 2010 रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्गला भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात जवळजवळ एक लाख वाघ होते असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातो, तर काहींच्या मते ही संख्या चाळीस हजारांच्या जवळपास सांगितली जाते. आता तर ही संख्या चार हजार इतकी खाली आली आहे. शिकार झाल्याने, नैसर्गिक मृत्यू आल्याने तीन ते चार टक्के. म्हणजे 4000 जवळजवळ वाघ शिल्लक आहेत. यापैकी 2200/2300 वाघ एकटय़ा हिंदुस्थानात आहेत. वाघाचे सरासरी आयुष्य साधारणपणे 14 ते 16-17 वर्षांचेच असते. काही वाघ 20/22 व्या वर्षी मृत्यू झाल्याची नोंद आहे.
हिंदुस्थानातल्या वाघाची लांबी साधारणपणे साडेआठ ते 11 फूट असल्याचे आणि वजन दीड ते पावणेदोन क्विंटल असल्याचे सांगितले जाते. वाघ ताशी 65 ते 70 कि.मी. वेगाने पळू शकतो. हत्ती सोडून इतर प्राण्यांची शिकार तो करतो. हिंदुस्थानात असलेला वाघ हा रॉयल बेंगॉल टायगर म्हणून ओळखला जातो.
आपला देश हा जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश आहे आणि म्हणूनच हिंदुस्थानसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. वाघाचे माहेरघर म्हणूनही हिंदुस्थानची ओळख आहे. वाघांची संख्या जास्त असल्याने हिंदुस्थान ही शेवटची आशा आहे असे म्हणतात. हिंदुस्थानात वाघाला वाचविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. देशात 39 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात नागपूर विभागातील व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक आहे असा पाहणी निष्कर्ष असल्यामुळे नागपूर ही जागतिक दृष्टीने वाघांची राजधानी संबोधण्यात येते.
चोरटय़ा शिकारी आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे याच कारणांमुळे वाघांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. त्यामुळेच ही वाघाची डरकाळी लुप्त होते की काय? अशी भीती निर्माण झाली होती. वाघाचे अस्तित्व धोक्यात आले होते. अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले. अशा परिस्थितीत वाघ आणि माणसाचे संबंध बिघडल्याचे जाणवते. वाढते शहरीकरण आणि व्याघ्र क्षेत्राचा समतोल साधला जाण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना व आवासाची आखणी होणे आवश्यक आहे, नाहीतर हा संघर्ष सुरूच राहणार आहे. परिस्थिती चिघळण्याआधीच शासकीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती म्हणून दखल घेणे आवश्यक वाटते. स्वयंसेवी संस्था जनजागृतीसाठी कार्यक्रम करत असतातच.
वाघ हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय प्राणी आहे. जंगलात वाघ असणे म्हणजे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात ही संख्या 2019 साली 312च्या जवळपास होती. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या माहितीनुसार 2012 ते 2017 या काळात 45 टक्के वाघांचा मृत्यू अनैसर्गिकरीत्या झाला. यात शिकार केलेल्या वाघांची संख्या 22 टक्के होती. 2014च्या गणनेनुसार देशात वाघांची संख्या 2226 होती, तर जगभरात 3890 वाघांची संख्या नोंद आहे. 2018 साली ती महाराष्ट्रात 303 च्या जवळपास असल्याचे आकडेवारीत दिसते. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार 2022 च्या व्याघ्र गणनानुसार महाराष्ट्रात जवळपास 446 वाघ आहेत. हिंदुस्थानातील एकूण वाघांची संख्या ही 3167 आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे हिंदुस्थानातील महाराष्ट्र राज्यात चंद्रपूर जिह्यातील एक वन्यजीव अभयारण्य आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. पावसाळय़ात ताडोबा पार्कला भेट देणे हा एक पर्यटकांसाठी खास अनुभव असतो. महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प-अमरावती, ताडोबा अंधारी – चंद्रपूर, पेंच व्याघ्र प्रकल्प-नागपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प-कोल्हापूर, नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्प-गोंदिया, बोर व्याघ्र प्रकल्प-वर्धा, विदर्भातच प्रकल्पांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात 446च्या जवळपास वाघांची नोंद वन विभागाकडे असल्याची माहिती आहे. वाघांची संख्या कमी होण्याची कारणे बघितली तर शिकारी, विद्युत प्रवाहाचा धक्का, दोन वाघांतला अधिवास संघर्ष यात वाघ मृत्यू पावले आहेत. 2016 सालात 100 वाघांचा मृत्यू झाला. 2017 सालात 98 वाघांचा मृत्यू झाला. 2018 सालात 100 वाघांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या सात/आठ वर्षांत मानव व वन्य प्राणी संघर्षात जवळपास पाचशेपेक्षा अधिक बळी गेले आहेत. विदर्भात याचा फटका जास्त बसला आहे. वाघांची संख्या वाढत असली तरी अधिवास कमी होत असल्याच्या कारणामुळे वाघ आणि माणसातला संघर्ष वाढला आहे. तरीही वाघांशिवाय जंगल नाही.
असा जंगलात राहणारा हा जंगलाचा राजा जंगलाचा श्वास आहे. ज्याला बघण्यासाठी लाखो पर्यटक अभयारण्याला भेटी देत असतात. कुठल्याही अभयारण्यात पर्यटक भेट देतात तेव्हा वाघाचे दर्शन व्हावे ही अपेक्षा ठेवून असतात. अनेक जंगली प्राणी दिसतात, पण वाघ दिसत नाही तोपर्यंत त्याची ट्रिप-पर्यटन पूर्ण होत नाही. त्याच कारणामुळे पर्यटक आपला मुक्काम वाढवतात. गेल्या काही वर्षांची आकडेवारी बघितली तर वाघ संपण्याची भीती निर्माण झाली आहे.
आपण एका दिवसापुरता जागतिक व्याघ्रदिन साजरा करतो. मग त्याचा विसर पडतो. वाघ ही जंगल संपत्ती आहे. त्याची जपणूक व्हायला हवी. अनेक देशांची आर्थिक घडी या जंगल संपत्तीवर बसली आहे. तेव्हा वाघांसह या वन संपत्तीचे रक्षण होणे, करणे हे आपले सगळय़ांचे कर्तव्य आहे. वाघांशिवाय जंगलाची पूर्णतः नाही. वाघांची संख्या महाराष्ट्रात झपाटय़ाने वाढत आहे. आज 450च्या जवळपास वाघ महाराष्ट्रात आहेत आणि त्यातील सुमारे 200 पेक्षा अधिक वाघ हे चंद्रपूर जिह्यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत. 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा उद्देश हाच की, वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करून जनजागृती करणे. जेणेकरून वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढणार नाही. त्यामुळेच वाघांचे जंगलातले अस्तित्व टिकून राहणार आहे आणि जंगलात वाघाची डरकाळी सतत घुमणार आहे.


























































