
>>दिलीप जोशी
संबळाचा स्वर आणि राजाराम बापूंच विजेच्या चपळाईने साकारणारं नृत्य मनाच्या ’संचिता’त कायम राहील. या शतायुषी कलाकाराचा कृतार्थ स्पर्श आजही आशीर्वादासारखा वाटतो.
जा गतिक मराठी परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या समारोपाला पु. ल. देशपांडे बोलत होते. प्रेक्षकांत व्ही. शांताराम, लता मंगेशकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. गोवारीकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्राr जोशी अशी महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांतली दिग्गज मंडळी बसली होती. त्यामध्येच परभणीचे शतायुषी तपस्वी गोंधळी राजारामबापू कदम हेसुद्धा होते. पु. ल. म्हणाले, मी ज्यांच्यातर्फे आभार मानावेत असं सांगण्यात आलं ती माणसं इतकी परामी आणि मोठी आहेत की, त्यांच्या वतीने उभं राहणं हाच माझा मोठा गौरव आहे असं वाटतं. पुढे पु. लं. राजारामबापूंकडे नजर जाताच म्हणाले, ”आता आमचे राजारामबापू आहेत इथे बसलेले. 103 वर्षांचा तरुण मनुष्य असं त्यांचं वर्णन केलं गेलं. त्यांच्या इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसांनासुद्धा घालता येत नाही. तुम्हाला सांगतो…” आणि नंतर झालेल्या हास्यकल्लोळात शरद पवार आणि वसंत साठेही सहभागी झाले होते. पुलंनी उल्लेख केलेला ’गोंधळ’ वेगळा, पण खरा, अस्सल आणि भक्तिभावपूर्ण असा जगदंबेचा ’गोंधळ’ ही मराठी मुलुखातली एक लोककलेतली प्राचीन परंपरा आहे. अनेकदा शुभकार्याची सांगता अशा गोंधळाने होते. आमच्याकडेही तशी पद्धत आहे. त्यासाठी गोंधळी मंडळींना पाचारण केलं जातं आणि उत्तररात्रीपर्यंत ’गोंधळ’ चालतो.
आठवतं त्यानुसार साधारण 1984 मध्ये मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात एका ज्येष्ठ–श्रेष्ठ कलाकाराचा विलक्षण ऊर्जेने भरलेला ’गोंधळ’ पाहिला होता. तब्बल 98 वर्षांचे, परभणीचे राजारामबापू कदम पायात जाडजूड चाळ बांधून आणि जवळपास 80 मीटर कपडय़ाचा चुणीदार अंगरखा परिधान करून रंगमंचावर लीलया थिरकत होते. भरदार मिश्या, लाल रंगाचं पागोटं, तेजस्वी नजर आणि अंगात कमालीचा नाद असं ते गोंधळ–नृत्य आम्ही सारे स्तिमित होऊन पाहत होतो. प्रेक्षकांत प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद आणि अनेक मातब्बर मंडळी होती. मुंबईच्या ’आयएनटी’ने तो कार्पाम आयोजित केला असावा असं आठवतं.
त्यानंतर दोनच वर्षांनी राजारामबापूंना मुंबईत भेटण्याचा योग आला. यावेळी ते 101 वर्षांचे होते आणि पॅरिसला जाऊन आपल्या मराठी मुलुखातली अस्सल लोककला सादर करून तिथल्या फ्रेंच प्रेक्षकांचीही मनं जिंकून आले होते. पॅरिस येथे झालेल्या ’भारत उत्सवा’चे मोठे आकर्षण ठरले होते.
मुलाखत घेतली त्यापूर्वी राजारामबापूंचे पुत्र, नातू, पणतू म्हणजे राधाकृष्ण (वय 72), दिगंबर (वय 40) आणि प्रल्हाद (15) अशा चार पिढय़ांच्या एकाच मंचावरच्या सादरीकरणाचं दृश्य मनात ठसलेलं होतं. मुलाखत ऑडिओ रेकॉर्ड होत होती. संयोजक रामकृष्ण ढेरे माहिती सांगत होते. बाबा म्हणजे राजारामबापू थोडंसंच बोलत होते.
”महाराष्ट्रात गोंधळाची परंपरा कधीपासूनची?” असं विचारताच ते एकदम उत्तरले ”जव्हापासून ही जगदंबा अवतरली तव्हापासून हा गोंधळ सुरू झाला.”
या परंपरेविषयी त्यावेळी ’आयएनटी’मधले अशोकजी परांजपे यांच्यासह कार्यरत असलेले सुरेश चिखले यांनी सांगितलं होतं की, इसवी सनाच्या पाचव्या शतकातील कदंबरायाच्या काळापासून या भक्तिरसपूर्ण लोककलेची परंपरा आढळते. तेवढय़ात राजारामबापू बोलले, ”हां, वरती अब्दागिरी शोभे कदम्बरायाची” अशी ओळ कवनात येते. गोंधळाचेही प्रकार असतात. पोताचे गोंधळी दिवटी घेऊन फिरतात. तेही संबळ, तुणतुणं ही लोकवाद्यं वाजवत देवाची गाणी म्हणतात. आख्यान गोंधळी यजमानाच्या घरी जाऊन शुभकार्याच्या वेळी गोंधळ सादर करतात. गोंधळी परंपरेत रेणुआई म्हणजे रेणुकामातेचे गोंधळी आणि कदम म्हणजे कदंब गोंधळी. फरक असा की, संबळाला जे पान (कापड) बांधतात ते रेणूआई गोंधळी त्रिकोणी आकाराचं, तर कदंब गोंधळी पिंपळपानासारखं बांधतात. मौखिक म्हणजे पाठांतराच्या पद्धतीने गोंधळ परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. गोंधळाच्या मंचावरची दिवटी म्हणजे साक्षात अंबामातेचं प्रतीक. मग गण झाला की, ’तुळजापूरचे माता माझे गोंधळाला यावे’ असं आवाहन केलं जातं आणि ’तुळजापूरची अंबाबाई हासुनिया गाली, आनंदाने आज माझ्या गोंधळाला आली’ असं तुळजाभवानीचं वर्णन येतं. त्या त्या गावात ’मुंबईतची मुंबादेवी बसली त्या ठायी’ असंही गायिलं जातं. हे सारं अनुभवणं रोमांचकारी आणि नेत्रसुखद असतं.
राजारामबापू पॅरिसला गेले ते 100 व्या वर्षी. तिथेच त्यांचा शतायुषी वाढदिवस साजरा झाला होता. पॅरिसमध्ये बाबांची पोस्टर्स लागली होती. वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेला कलाकार काही सादर करतोय याविषयी तिथल्या लोकांना खूप कुतूहल होतं. कार्पाम संपताना कित्येक प्रेक्षक भारावून भेटीला आले. त्याविषयी गोंधळ महर्षी राजारामबापू सांगत होते, ”परक्या मुलुखातले लोक, पण फार कौतुक केलं. आमची मऱहाटी भाषा त्यांना कळंना आणि त्यांची आम्हाला कळंना. तरी सारखे येऊन भेटायचे. हात हाती घेऊन कौतुक करायचे. कुठल्या कोण माऊली, त्यासुद्धा यायच्या!” संबळाचा स्वर आणि राजाराम बापूंच विजेच्या चपळाईने साकारणारं नृत्य पाहून पॅरिसकर अवाक झाले. मुंबईतही तो अनुभव आम्ही घेतला होताच. या मुलाखतीचं ध्वनिमुद्रण एका पावसाळय़ातल्या मुंबईत आलेल्या पुरात नष्ट झालं, पण मनाच्या ’संचिता’त त्या साऱया स्मृती अजूनही ताज्या आहेत. या शतायुषी कलाकाराची गळाभेट झाली होती. तो कृतार्थ स्पर्श आजही आशीर्वादासारखा वाटतो.





























































