वय अवघे 97, ‘ट्रॅजिडी किंग’वर प्रेमाचा भरभरून वर्षाव

475

आपल्या अफलातून अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणार्‍या ‘ट्रॅजिडी किंग’ दिलीपकुमार यांचा 97वा वाढदिवस बुधवारी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करत साजरा केला. केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला आयुरारोग्याच्या शुभेच्छा दिल्या. दिलीपकुमारही चाहत्यांच्या या प्रेमाने भारावले.

ट्विटरवर आपले छायाचित्र पोस्ट करत दिलीपकुमार यांनी चाहत्यांचे आभार मानले. कोणताही जल्लोष करू नका. तुमचे प्रेम, शुभेच्छा आणि प्रार्थना यामुळे माझ्या डोळ्यांत आसवे उभी राहतात, असे ट्विट ट्रजिडी किंगने केले आहे. ‘मुघल-ए-आझम’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’, ‘गंगा जमुना’, ‘देवदास’, ‘अंदाज’, ‘ज्वार भाटा’, ‘बैराग’ अशा असंख्य चित्रपटांद्वारे दिलीपकुमार यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. वाढत्या वयाशी संघर्ष करत असलेल्या दिलीपकुमार यांची देखभाल त्यांची पत्नी सायरा बानो करत आहेत. त्यांना प्रतिष्ठत दादासाहेब फाळके पुरस्कारासोबतच ‘निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मिळाला आहे.

चित्रपटांपेक्षा आयुष्य रंगतदार

पाकिस्तानातील पेशावर येथे जन्म झालेल्या दिलीपकुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान असे आहे. त्यांचे वडील लाला गुलाम सरवर अली खान एक जमीनदार होते. दिलीपकुमार यांचे आयुष्य त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त रंगतदार होते. मधुबालावर प्रेम आणि सायरा बानोशी विवाह हा त्यांच्या आयुष्यातील ट्विस्ट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या