
पेशावरमधील सर्वसामान्य फळ विव्रेत्याचा मुलगा युसूफ ते बॉलिवूडचे सुपरस्टार दिलीप कुमार हा प्रवास थक्क करणारा आहे. बालपणी अभिनयापेक्षा युसूफला खरंतर फुटबॉल, क्रिकेटमध्ये जास्त जास्त रस होता. पण नशिबाने त्यांच्यासाठी बॉलिवूडचे दार उघडले. अपघाताने अभिनयाकडे वळलेल्या युसूफमुळे बॉलिवूडला अभिनयसम्राट दिलीप कुमार मिळाला.
असं झालं नामकरण
दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान. मग ते दिलीप कुमार कसे झाले? युसूफ खानचा दिलीप कुमार बनण्यामागील किस्सा त्यांच्या फिल्मी करियरच्या प्रारंभाशी जोडला गेला आहे. 1944 साली ’ज्वार भाटा’ सिनेमा प्रदर्शित झाला. त्यावेळी बॉलिवूडची पहिली स्टार अभिनेत्री देविका राणी यांनी युसूफ खानला ’दिलीप कुमार’ या नावाने प्रेक्षकांसमोर आणले. नामकरणाचा किस्सा दिलीप कुमार यांनी ’द सबस्टेंन्स अँड द शॅडो’ आत्मचरित्रामध्ये लिहिला आहे. ’देविकाने मला सांगितले की अभिनेता म्हणून तुला लाँच करतेय. स्क्रीनवर तुझं नाव बदलण्याची आयडीया काही वाईट नाही. असं नाव ज्याने तुझी ओळख बनेल… एक असं नाव जे पडद्यावरील रोमँटिक छबीला सार्थ ठरेल. मला वाटतंय ’दिलीप कुमार’ हे नाव चांगलं आहे. मी तुझ्यासाठी नाव शोधत होते, तेव्हा हे नाव माझ्या डोक्यात आलं. तुला काय वाटतंय? पुढे युसूफ खानला ’दिलीप कुमार’ नाव पसंत पडले. त्यांनी याच नावाने आपले फिल्मी करियर सुरू केले आणि मग दिलीप कुमारने कधी मागे वळून पाहिलं नाही, अशी माहिती आत्मचरित्रात देण्यात आली आहे.
वडिलांच्या भीतीने नाव बदलले
दिलीप कुमार यांचे वडील कडक शिस्तीचे होते. त्यांना मुलांनी सिनेमात काम केलेले आवडायचे नाही. जर वडिलांना समजले की मी फिल्म इंडस्ट्रीत गेलोय, तर ते चिडतील आणि मला मारतील, या भीतीने मी नाव बदलले असेही दिलीप कुमार यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. ते म्हणाले, माझ्यासमोर तीन नावांचे पर्याय ठेवण्यात आले. युसूफ खान, दिलीप कुमार आणि बासुदेव. वडिलांच्या माराच्या भीतीने मी म्हटले युसूफ खान नाव ठेवू नका. बाकी तुमच्या मनात जे नाव असेल ते ठेवा. त्यानंतर दोन- तीन महिन्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात बघितली, तेव्हा माझे नाव दिलीप कुमार ठेवण्यात आलेय, असं मला समजलं.
पेशावरच्या आठवणीत रमायचे…
दिलीप कुमार यांची वडिलोपार्जित हवेली पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजारात आहे. 100 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या हवेलीत त्यांचा जन्म झाला होता. हे घर आता मोडकळीस आलेल्या स्थितीत आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत सरकारने या घराला राष्ट्रीय वारसा घोषित केले असून त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्या मूळ जन्म ठिकाणाबाबत त्यांच्या मनात वेगळीच भावना होती. एकदा ट्विटरवर त्यांनी पेशावरमधील घराच्या आठवणी चाहत्यांना सांगितल्या होत्या तसेच या घराचे फोटो पाठवण्याचे आवाहन तेथील चाहत्यांना केले होते.
लहान बहिणीला सोडून गेलात, लता मंगेशकर यांना भावना अनावर

दिलीप कुमार यांच्या निधनाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर शोकापुल झाल्या. युसूफभाई आज आपल्या छोटय़ा बहिणीला सोडून गेले… असं म्हणत लता मंगेशकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
युसूफभाईंच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला. मला काहीच सुचत नाहीय. मी दु:खी आहे. निशब्द झालेय. तुम्ही खूप आठवणी देऊन आम्हाला सोडून गेलात. ते गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. कुणाला ओळखत नव्हते. अशा वेळी सायरा वहिनीने दिवसरात्र त्यांची सेवा केली. त्यांच्यासाठी दुसरं जीवनच नव्हतं, अशा स्त्रियांना मी प्रणाम करते. युसूफभाईच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी प्रार्थना करते, अशी भावुक पोस्ट लतादीदींनी लिहिली. लतादींदीनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देताना सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. त्यात लतादीदी दिलीप कुमार यांना राखी बांधताना दिसत आहेत.
सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा…
हिंदी सिनेसृष्टीत दिलीप कुमार यांच्यानंतर नाव घेतले जाते ते ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांचे. अमिताभ बच्चन हे दिलीप कुमार यांचे मोठे फॅन आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या निधनाने बिग बी भावुक झाले. आपल्या भावना व्यक्त करताना अमिताभ म्हणाले, दिलीप कुमार अभिनेते नव्हते, तर सिनेमाची एक संस्था होते. जेव्हा हिंदुस्थानी सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीप कुमार यांच्या नंतर… असाच लिहिला जाईल. एका युगाचा अंत झाला, असे ट्विटही अमिताभ यांनी केले.
‘शक्ती’ सिनेमात दिलीप कुमार आणि अमिताभ यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांनी एकत्र सिनेमा केलेला नाहीत. दिलीप कुमार प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्या एका स्वाक्षरीसाठी अमिताभ हॉटेलाबाहेर अर्धा तास रांगेत उभे राहिले होते. पुढे दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांनी काम केले.
55 वर्षांची साथ सुटली

दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानू म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतील आदर्श जोडपं. दोघांच्या वयात 22 वर्षांचे अंतर. वयाने मोठय़ा असलेल्या दिलीप कुमारांच्या प्रेमात बुडालेल्या सायराने आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना निष्ठsने साथ दिली. त्यांची सावली बनून ती जगली. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली होती. जगभरातील त्यांचे चाहते त्यांच्यासाठी दुवा करत होते. सायराला खरी परिस्थिती समजून चुकली होती. तरी ‘दिलीपसाब के लिए दुवाये करना’, असं सांगत चाहत्यांना ती दिलासा देत राहिली. अखेर आज तो दिवस आलाच. 55 वर्षांची साथ सुटली… हात हातातून सुटला. सायराचे साहिबे आलम तिला सोडून गेले.
सायरा बानू यांना वयाच्या 12व्या वर्षापासून दिलीप कुमार आवडू लागले होते आणि त्यांच्याशीच लग्न करायचे त्यांनी ठरवले होते. सायराची आई नसीम बानो यांच्यामुळे सायरा आणि दिलीप कुमार भेटले व त्यांची प्रेमकहाणी फुलत गेली. परदेशातून परतलेल्या सायराला भेटायला दिलीप कुमार रोज चेन्नईत जायचे. सकाळचे विमान पकडून पुन्हा शूटिंगला हजर व्हायचे. सायराच्या आई-आजीची परवानगी घेऊन पहिल्यांदा कारमधून तिला फिरायला घेऊन गेले. त्याच वेळी त्यांनी सायरासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. 1966 साली दोघांनी लग्न केले. त्या वेळी सायरा 22 वर्षांच्या तर दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. दुनिया, बैराग, गोपी आणि सगीन यांसारख्या अनेक सिनेमांत दोघांनी काम केले. दोघांचे सिनेमा मोठय़ा पडद्यावर हिट ठरले होते. त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी ऑफस्क्रीनही पसंत केले होते. लग्नानंतरही सायरा यांनी सिनेमात काम केले. 1976 साली सायराने सिनेमात काम करणे थांबवले आणि संपूर्ण वेळ संसार आणि पतीसाठी दिला. दिलीप-सायरा यांची जोडी म्हणजे बॉलिवूडचे आदर्श जोडपे होते. त्यांना मूल नव्हते. दोघांनी जीवनात अनेक चढउतार बघितले आणि त्यांचा एकत्रित सामना केला.
अधुरी प्रेमकहाणी
कुठलाही अभिनेता यशोशिखरावर असताना त्याच्या प्रेम प्रकरणांमुळेदेखील चर्चेत असतो. बॉलिवूडमधल्या प्रेम प्रकरणांची चर्चा होते तेव्हा मधुबाला-दिलीप कुमार या जोडीचे नाव आवर्जून घेतले जाते. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. दोघांनी ‘तराना’, ‘संगदील’, ‘अमर’ आणि ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटांत एकत्र काम केले. दोघांचे प्रेम बहरत असताना मधुबालाच्या वडिलांनी त्यांच्यात आडकाठी निर्माण केली. मधुबालाच्या वडिलांना त्यांचे नाते कबूल नव्हते. त्यामुळेच त्यांनी दोघांना ‘नया दौर’ या चित्रपटात काम करू दिले नाही. चित्रपटात ऐन वेळी काम करण्यास नकार दिल्याने निर्माता-दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांनी मधुबालावर खटला दाखल केला. त्या वेळी न्यायालयात दिलीप कुमार यांनी मधुबालाऐवजी बी.आर. चोप्रा यांना साथ दिली. त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.
‘लाख’मोलाचा अभिनेता

बॉलीवूडमध्ये आज अनेक कलाकार कोटय़वधी रुपये मानधन घेतात. परंतु पन्नासच्या दशकात सर्वाधिक म्हणजे एक लाख रुपये मानधन घेणारे दिलीप पुमार हे पहिले अभिनेते ठरले होते. एकापेक्षा एक उत्तम सिनेमे दिल्यामुळे त्यांना आपल्या सिनेमात घेण्याची त्या काळी प्रत्येक निर्मात्याची इच्छा असायची. सिनेमांना मिळणारे यश पाहता त्यांनी आपले मानधन वाढवले होते. विशेष म्हणजे ‘ज्वार भाटा’ या पहिल्या सिनेमासाठी त्यांना केवळ 1250 रुपये मानधन मिळाले होते.
पाच वर्षांचा ब्रेक आणि दमदार कमबॅक
सत्तरीच्या दशकात बिग बीसारख्या कलाकारांची बॉलिवूडमध्ये एंट्री झाल्यानंतर दिलीप कुमार यांचे काही चित्रपट फ्लॉप झाले. म्हणून त्यांनी पाच वर्षांचा ब्रेक घेतला. ‘क्रांती’ चित्रपटापासून नवीन अवतारात कमबॅक केले. त्यानंतर त्यांनी वयाला साजेशा भूमिका स्वीकारल्या. ‘शक्ती’, ‘विधाता’, ‘कर्मा’, ‘सौदागर’, ‘मशाल’मधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. 1998मध्ये आलेल्या ‘किला’ या चित्रपटात त्यांनी शेवटची भूमिका साकारली.
आठ वेळा फिल्मफेअर
आपल्या फिल्मी कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी दाग, आझाद, देवदास, नया दौर, कोहिनूर, लीडर, राम और शाम आणि शक्ती या चित्रपटांसाठी तब्बल आठ वेळा सर्वेत्पृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पटकावला आहे. त्यांचा हा रेकाॅर्ड अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. याशिवाय पद्मभूषण (1991), ‘दादासाहेब फाळके पुरस्कार (1994), पद्मविभूषण (2015), पाकिस्तान सरकारतर्फे ‘निशान-ए-इम्तियाझ (1997) आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
स्वत:ची वेगळी शैली निर्माण करणारा एक अभ्यासू नट आज चित्रपटसृष्टीने गमावला आहे. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील. दुर्दैवाने मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु माझ्या संशयकल्लोळ नाटकाच्या एका प्रयोगाला ते आणि सायरा बानो हजर होते. संगीत नाटक असूनही पूर्ण सहा अंक त्यांनी एकाच जागी बसून पाहिले. प्रयोगानंतर आतमध्ये ते मला भेटायला आले. ‘क्या गजब की टायमिंग है आपकी’ अशा शब्दांत काwतुक करत माझी पाठ थोपटली. कारकिर्दीच्या सुरुवातीला मला एवढय़ा महान नटाकडून मिळालेली काैतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. – अशोक सराफ, अभिनेते
दिलीपसाहेब हे माझ्यासाठी प्रेरणास्थान होते. मी दिग्दर्शित केलेल्या कर्मा, विधाता, सौदागर या चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी माझे संपूर्ण जीवन बदलून टाकले. चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी व्हिसलिंग वुड्स संस्था मी जरी स्थापन केली असली तरी त्यामागची कल्पना त्यांची होती. भावी पिढीसाठी तू काहीतरी केले पाहिजे असे ते मला म्हणायचे. एक उत्तम शिक्षक, भाऊ, मित्र आज मी गमावला आहे. – सुभाष घई, दिग्दर्शक
जगासाठी अनेक हिरो असतील. पण आम्हा अभिनेत्यांसाठी तेच हिरो होते. दिलीप कुमार आपल्यासोबत सिनेमाचे एक युग घेऊन गेले आहेत. माझ्या भावना आणि प्रार्थना त्यांच्या परिवारासोबत आहेत. ओम शांती. – अक्षय कुमार, अभिनेता


























































