थरारक ‘दशावतार’! 80 वर्षांच्या नटश्रेष्ठ अभिनेत्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक चर्चेत

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. यापैकीच एक तुमचे आमचे लाडके अभिनेते श्रीयुत गंगाधर टिपरे म्हणजेच दिलीप प्रभावळकर. अभिनेते दिलीप प्रभावळकर आजही त्यांच्या अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर केल आहे. सध्या त्यांच्या नावाची चर्चा आहे ती म्हणजे ‘दशावतार’मुळे. अभिनेते दिलीप प्रभावळकर दशावतार या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘दशावतार’ हा चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असणार आहेत. चौकट राजा, तात्या विंचू, चिंची चेटकीण, श्रीयुत गंगाधर टिपरे अशा भूमिका गाजवणारे अभिनेते दिलीप प्रभावळकर वयाच्या 80 व्या वर्षी सर्वात वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, रूढीपरंपरा, लोककला यांचं दर्शन घडवणारा आणि थरारक कथेची जोड असलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, सुजय हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, विनायक जोशी आणि संजय दुबे यांनी केलं आहे.