
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यावरून तो निर्देष असल्याचेही म्हणता येऊ शकेल. मग एनसीबीने खोटी केस का केली त्यासंदर्भात चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज केली.
पारनेरच्या पिंपळनेर येथील एका कार्यक्रमासाठी आलेले गृहमंत्री वळसे-पाटील यांना प्रसारमाध्यमांनी आर्यन खान प्रकरणाबद्दल विचारले. त्यावेळी ते म्हणाले की,‘आर्यन खानविरोधात पुरावे नसल्याचे न्यायालयाने म्हटले असेल तर तो निर्देष आहे असेच म्हणावे लागेल. मग एनसीबीने त्याच्याबाबत चुकीची भूमिका का घेतली याची चौकशी करावी लागेल.’ केंद्र सरकारकडून सातत्याने तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.























































