
बीडच्या जिल्हा रुग्णालयात कोविड 19 अंतर्गत कंत्राटी पदासाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. कोविड 19 अंतर्गत बीड जिल्हा रुग्णालय व अधिनस्त कोविड आरोग्य संस्थेत तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे
बीडच्या जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कंत्राटी पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे. 12 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी व आयुषच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, (बीड) तालुका अंतर्गत सर्व कोविड संस्था, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय, परळी, गेवराई, माजलगाव, आष्टी, पाटोदा, चिंचवण, धारूर, रायमोहा नर्सिंग स्कूल लोखंडी, सावरगाव आणि स्वा. रा. ती. वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे मुलाखतीस सकाळी 10 वाजता हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे आवश्यकतेनुसार उमेदवार उपलब्ध मिळाले नाही तर रिक्त पदांच्या संख्येनुसार दर शनिवारी मुलाखती आयोजित करण्यात येतील, असेही नमूद करण्यात आले आहे.






























































