
मुंबईसह महाराष्ट्रात ‘तौकते’ या चक्रीवादळाचे संकट उभे ठाकलेले असतानाच महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख संजय पांडे यांनी शनिवारी चंदिगडला प्रयाण केले. सोमवारी संजय पांडे मुंबईत येणार होते, परंतु मुंबईला येणारी विमाने चक्रीवादळामुळे रद्द झाल्याने ते चंदिगडलाच अडकले. चक्रीवादळाचे संकट असताना महासंचालकांनी राज्य सोडल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘तौकते’ या चक्रीवादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला मोठा धोका असल्याचा इशारा अलीकडे हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे साऱया शासकीय यंत्रणा जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाईत गुंतलेल्या असताना महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख ‘डीजीपी’ संजय पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांना व नागरिकांना वाऱयावर सोडून शनिवारी विमानाने चंदिगड गाठले. तेथे त्यांच्या घराचे काम सुरू असल्याने त्याच्या देखरेखीसाठी ते स्वतः दर शनिवारी चंदिगडला रवाना होतात व सोमवारी पुन्हा महाराष्ट्रात परततात, असे सांगण्यात येते. परंतु सोमवारी मुंबईला येणारी विमाने चक्रीवादळामुळे रद्द झाल्याने त्यांची ही वारी उजेडात आली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
वास्तविक अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस (Disaster management Act प्रमाणे) कर्तव्य बजावयाचे सोडून कोणत्याही अधिकाऱयाने सुट्टीवर जाणेच गैर आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस जीवित व वित्तहानी होते. लोक विस्थापित होतात. महामार्गावर अपघात होतात. अशा वेळेस पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलिसांचे मुख्य नियंत्रण कक्ष मॉनिटर करणे आवश्यक होते. परंतु राजीनामा देऊन अनेक वर्षे अज्ञातवासात असलेल्या संजय पांडे यांनी दीड दशकापेक्षाही अधिक काळ पोलीस दलाचे कामच न केल्याने किंवा पोलिसी कामच विसरल्याने ते चंदिगड येथे बनत असलेल्या आपल्या टुमदार घराचे काम बघावयास गेले होते, असे पोलीस दलात बोलले जात आहे. पांडे यांनी डीजीपी पदाची सूत्रे हाती घेऊन महिना लोटला होता. त्या अवधित व गृह रक्षक दलात असताना त्यांनी चंदिगडला विमानाने किती वाऱया केल्या, त्याला परवानगी होती का? असेल तर त्या वाऱया सरकारी खर्चाने होत्या का? याची चौकशी व्हावी, अशी मागणी पोलीस दलातून करण्यात येत आहे.
संजय पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवला आहे. आल्या आल्या त्यांनी खात्यातील साफसफाई मोहीम हाती घेऊन अनेक अधिकाऱयांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले. त्यावर पोलीस खात्यात नाराजीचा सूर उमटला. ‘पांडे’ यांच्या चंदिगड कनेक्शनचे रहस्य काय? यावर चर्चा असून गेल्या वर्षभरात पांडे यांनी चंदिगडच्या ‘डझनभर’ फेऱया केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शनिवारी चंदिगडला गेलेले पांडे मुंबईतील तौकते वादळामुळे तेथेच अडकून पडले. वादळामुळे मुंबई विमानतळ बंद ठेवल्याचा फटका विमानसेवा व पांडे यांनाही बसला आहे.
राज्य सोडल्याने गृहमंत्री नाराज
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे शनिवारपासून अचानक गायब झाले. पोलीस महासंचालक पदावरील अधिकाऱयाने असे ‘गायब’ होऊ नये व राज्यातून बाहेर पडायचे असेल तर गृहमंत्र्यांची रितसर परवानगी घेणे असा नियम आहे, परंतु त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे समजते. मात्र इतरांना शिस्तीचे धडे देणाऱया संजय पांडे यांनी सर्व नियम बाजूला ठेवून अचानक चंदिगड गाठले. गृहमंत्री वळसे-पाटील यांना एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पोलीस महासंचालकांना पाचारण करायचे होते. पांडे हे शनिवारी बराच काळ ‘नॉट रिचेबल’ होते व शेवटी ते चंदिगडला पोहोचल्याचे समोर आले. पांडे यांनी सेवा शर्तींचा भंग केल्याने गृहमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
































































