
सामना ऑनलाईन । मुंबई
ध्येर्या, ढुंग्या आणि कबीरची महाविद्यालयीन भानगड दाखवणार्या ‘बॉईज 2’ चे इंजिन बॉक्स ऑफिसकर सलग तिसर्या आठवड्यातही सुसाट वेगाने धावत आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत 5 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या सुपर डुपर हिटचे नुकतेच मुंबई येथे मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन करण्यात आले. ‘बॉईज 2’ चे निर्माते राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सक्सेस पार्टीत, ‘बॉईज 3’ सिनेमाची घोषणादेखील करण्यात आली. तसेच या सिनेमाने अवघ्या 17 दिवसांमध्ये 16 कोटीहून अधिक कमाई केली असल्याची माहिती इरॉस इंटरनॅशनलचे नंदू अहुजा यांनी दिली.
वरळी येथील आलिशान जेड गार्डनमध्ये पार पडलेल्या या पार्टीचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला. यादरम्यान, ‘बॉईज 2’ चा दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी ‘बॉईज 2’ला दिलेल्या भरघोस प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच यापुढे ‘बॉईज 3’ साठी ऋषिकेश कोळीसोबत पुन्हा तयारीला लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.


























































