घाण निघून गेली, आता जे होईल ते चांगलेच होईल! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकारण म्हटल्यावर लोक बदलू शकतात. मात्र आपल्याच लोकांनी दगा दिला याचे दुःख जास्त आहे.  पण होते ते चांगल्यासाठीच असे म्हणावे लागेल. घाण निघून गेली, आता जे होईल ते चांगलेच होईल, असा घणाघात करतानाच आता लढा जिंकण्यासाठीच असेल, असा ठाम विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

वरळी येथे आयोजित मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी आमदारांच्या बंडखोरीचा समाचार घेतला. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आपण वरळीतून उमेदवारी जाहीर केली त्यावेळेचाच प्रचंड उत्साह आताही शिवसैनिकांमध्ये दिसत असल्याचे गौरवोद्गार यावेळी आदित्य ठाकरे यांनी काढले. हा आवाज केवळ मुंबई-महाराष्ट्रातच नाही तर गुवाहाटीमध्येही पोहोचला असेल, असा टोलाही त्यांनी लगावला. नुकत्याच भेटलेल्या कल्याण-डोंबिवलीतील लोकांना काहीजणांनी ‘मातोश्री’पर्यंत कधीही पोहोचू दिले नाही, असेही सांगितल्याचेही ते म्हणाले. यावेळी आमदार अजय चौधरी, भास्कर जाधव, सचिन अहिर, मनीषा कायंदे, सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्यासह शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

25 वर्षे मुंबईला नजर लावू दिली नाही

मुंबई महानगरपालिकेवर भाजपसारख्या सर्वच पक्षांचा डोळा आहे. मात्र शिवसेनेने गेल्या 25 वर्षांत मुंबई महानगरपालिकेला कुणाची नजर लावू दिली नाही, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहून शिवसेना कुठे आहे असा सवाल उपस्थित करणाऱयांसाठी आजचा मेळावा उत्तम उदाहरण असल्याचे यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले. शिवसेनेला कुणाकडून हिंदुत्वाच्या प्रशस्तिपत्रकाची गरज नाही. हिंदुत्वासाठी केवळ शिवसेनेने त्याग केला. भाजपने 30 वर्षे हिंदुत्वाचा उपयोग केवळ मतांसाठी केला, असे सांगतानाच ‘घातकी मित्रापेक्षा, दिलदार शत्रू बरा,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

‘त्यांची’ खरी फ्लोअर टेस्ट रस्त्यावर होईल

नेहमी शिवसेनेसोबत राहणार असे सांगणाऱयांनी पक्षाला अचानक दगा दिला. पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. आमचे ‘घर’ तोडण्याचे पाप ते करीत आहेत. मात्र शिवसेना-शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत. त्यांची खरी ‘फ्लोअर टेस्ट’ रस्त्यावर, विमानतळावर उतरल्यावर होईल, असा इशारा आमदार सचिन अहीर यांनी दिला. ‘प्राइज टॅग’ लावून पळालेल्या बंडखोरांची स्थिती ‘न घर का, ना घाट का’ अशी होईल, असेही ते म्हणाले.

मोह नसणारा मुख्यमंत्री

काही जण ‘मी पुन्हा, येईन, मी पुन्हा येईन’ म्हणायचे. सत्ता गेल्यानंतरही ते बंगले सोडायला तयार नव्हते. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासारखा मोह नसणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. शब्दाला जागणारा हा माणूस आहे. त्यांच्या कोरोना काळातील कामाचे काwतुक जगभरात झाले. ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’वर जातानाचे दृश्य आणि सध्याच्या स्थितीत शिवसेनेला मिळणारे प्रेम पाहून ‘परिवार’ काय असतो याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

 हिंमत असेल तर राजीनामा द्या 

पळून गेलेल्या लोकांना शिवसेनेने काय कमी दिले, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेविरोधात लढण्याची हिंमत असेल तर राजीनामा देऊन समोर या, आम्ही लढायला तयार आहोत, असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिले. फ्लोअर टेस्टच्या दिवशी कुणाची किती हिंमत आहे ते कळेल, असेही ते म्हणाले. सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात गेल्याचा हा पहिलाच प्रकार असेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. काही आमदारांचे अपहरण करून नेण्यात आले आहे, तर काही जण तपास यंत्रणांना घाबरून गेले. ते आपले कधीच नव्हते, असेही ते म्हणाले.