
नैसर्गिक आपत्तींच्या काळात प्रभावितांना तत्काळ मदत मिळणे आवश्यक असते. एनडीआरएफची पथके मर्यादित असल्याने त्यांना घटनास्थळी वेळेवर पोहचता येत नाही. दरम्यानच्या काळात मदतकार्य सुरू होणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमण्यात येणार आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्या वेळी त्यांनी यासंदर्भात सूचना दिल्या. महानगरपालिकांनीदेखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करा, कोकण आपत्ती सौम्यीकरणाची कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोकणातील कामांना वेग द्या
कोकणात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. कोकणातील आपत्ती निवारणाच्या कामांसाठी यापूर्वी शासनाने 3200 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात भूमिगत वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळामधले आसरे बांधणे, दरडप्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय, वीज अटकाव यंत्रणा यांचा समावेश आहे. ही कामे तत्काळ सुरू करून वेगाने करण्यात यावीत, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या.
गतवर्षी आपत्तींमुळे 437 मृत्यू
मागील वर्षात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे 437 जण मरण पावले असून 680 जखमी झाले आहेत. तर 4348 जनावरे मरण पावली आहेत, अशी माहितीही विभागाने बैठकीत दिली. बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक तसेच पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुख्यमंत्री सचिवालयातील तसेच इतर सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




























































