
तामीळनाडूच्या विरुधुगनरच्या एका गावात राहणारा 21 वर्षांचा टेनिथ आदित्य याच्यासाठी ‘जिनियस’ हेच विशेषण योग्य ठरते. आदित्याने एवढय़ा कमी वयात कित्येक आविष्कार केले आहेत. त्याची बनाना लीफ टेक्नोलॉजी तर भन्नाट आहे. केळीच्या पानांपासून ताट, वाटी, स्ट्रॉ, ग्लास अशा वस्तू त्याने तयार केल्या आहेत. सिंगल युज प्लॅस्टिक आणि पेपरला एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
टी. आदित्यने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. त्याने आतापर्यंत 19 आविष्कार केलेत. त्याच्या नावावर 17 आंतरराष्ट्रीय, 10 राष्ट्रीय आणि 10 राज्यस्तरीय सन्मान आहेत. प्रत्येक दिवशी त्याला नवीन काहीतरी शिकायचे असते. वयाच्या 8 व्या वर्षापासून त्याने प्रयोगाला सुरुवात केली. पुढे तर त्याने घरातच लॅब बनवली.
आदित्यने सेल टेक्नॉलॉजीचा केळीच्या पानांवर प्रयोग करून बनाना लीफ टेक्नॉलॉजीचे संशोधन केले. या तंत्रामुळे पानांचे आयुष्य तीन वर्षांपर्यंत वाढते.
केळीच्या पानांपासून बनवलेल्या वस्तू केमिकल फ्री आणि ईकोफ्रेंडली बायोमटेरियल स्वरूपात वापरू शकतो. त्यांचे जैविक विघटन होऊ शकते. पर्यावरणाला हानी पोचणार नाही. या वस्तू कोणत्याही तापमानात वापरता येतात. केवळ केळीच्या नव्हे तर अन्य पानांवरही ही टेक्नॉलॉजी लागू होते.
टी. आदित्य 35 कॉम्प्युटर ऑप्लिकेशन आणि 9 कॉम्प्युटर लँग्वेजचा मास्टर आहे. वयाच्या 13 व्या वर्षी त्याने पॉवर माईंड नावाचा कॉम्प्युटर प्रोग्रॅम बनवला.























































